गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सराफा दुकानावर फिल्मी स्टाईल दरोडा, 10 कोटींचे दागिने घेऊन दरोडेखोरांचा पोबारा

सांगलीमध्ये सराफा दुकानावर फिल्मी स्टाईलने टाकण्यात आला असून दरोडेखोरांनी जवळपास 10 कोटी रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.सांगली-मिरज मार्गावरील गजबजलेल्या वस्तीमध्ये ‘रिलायन्स ज्वेल्स’ नावाचे सोने-चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे.

ग्राहक बनून दुकानात आलेल्या दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना बांधून ठेवले आणि दिवसाढवळ्या दुकानावर दरोडा टाकला. दरोडेखोर कोट्यवधींचे दागिने घेऊन फरार झाले आहेत. जाताजाता दरोडेखोरांनी एकावर गोळीबारही केला. परंतु सुदैवाने तो बचावला. हा प्रकार मार्केट यार्डजवळ भररस्त्यावर घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘रिलायन्स ज्वेल्स’ या नावाचे तयार दागिने विक्रीचे दुकान मुख्य सांगली-मिरज मार्गावर आहे. रविवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास ग्राहक म्हणून दुकानात आलेल्या पाच ते आठ लोकांनी बंदुकीचा धाक दाखवत कर्मचाऱ्यांना बांधले. ओरडू नये म्हणून तोंडाला चिकटपट्टी लावून धमकावत अख्खे दुकान साफ केले. दरोडेखोरांनी शोकेसमधील सर्व दागिने लंपास केले. व्यवस्थापकाला मारहाण केली. या दरम्यान अन्य एक ग्राहक पळून जात असताना त्याच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. गोळीबारात तो बचावला मात्र, ,स्वत:ला वाचवताना रेलिंगवरुन पडल्याने तो जखमी झाला.

या प्रकाराने सांगली हादरली असून पोलीस अधिक्षक बसवराज तेली, उपअधिक्षक आण्णासाहेब जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, विश्रामबाग ठाण्याचे पथक यांनी घटनास्थळी धाव घेतली असून चोरीस गेलेल्या दागिन्यांची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे दहा कोटी रुपयांचा माल गेल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *