गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मित्रांमध्ये भांडणाचा भडका, मित्राचे वडील समजवायला आले त्यांच्यावर गोळीबार

नांदेड शहर गोळीबाराच्या घटनेने पुन्हा हादरलं आहे. शुल्लक कारणावरून एका तरुणाने शेजारी राहणाऱ्या आपल्या मित्राच्या वडिलांवर गोळी झाडली. गोळी कमरेला लागल्याने तो व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धार्थनगर येथे ही घटना घडली. साहेबराव जोगदंड असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.या घटनेनंतर पारिसरात खळबळ उडाली होती.

जखमी साहेबराव जोगदंड यांचा मुलगा आणि शेजारी राहणारा आरोपी शुभम पारदे उर्फ बाहुबली याच्यात गुरुवारी दुपारी वाद झाला होता. या वादानंतर साहेबराव जोगदंड हे आरोपीला समजावण्यासाठी गेले होते. परंतु, पुन्हा त्यांच्यात वाद झाला. या वादातून आरोपी शुभमने जवळ असलेल्या गावठी पिस्टलमधून साहेबराव जोगदंड यांच्यावर गोळी झाडली. जोगदंड यांच्या कमरेला गोळी लागली असून ते जखमी झाले आहेत. त्यांच्यावर विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधिकारी अबिनाशकुमार, भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या सह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपी हा टोळी बनवून परिसरात दहशत निर्माण करायचा. परिसरातील अनेकांसोबत तो वाद देखील घालायचा. भाग्यनगर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात अनेक गुन्हे देखील आहेत. या गोळीबाराच्या घटनेने नांदेड शहर पुन्हा हादरलं आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *