ताज्याघडामोडी

२ हजार रुपयांच्या नोटा जमा करताना काय काळजी घ्याल? SBI ने सोप्या शब्दांत सांगितल्या नियम-अटी

दोन हजारांच्या नोटा बदलण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी नव्या नोटाबंदीच्या काळात अधिक सुलभ व्यवस्था करण्यात आली आहे. या नोटा बदलण्यासाठी बँकेत कोणताही अर्ज, ओळखपत्र किंवा अधिग्रहण पत्राची (रिक्विजिशन स्लिप) गरज भासणार नाही.

रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी दोन हजारांच्या नोटा व्यवहारातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केल्याने अनेकांसमोर यापूर्वीच्या नोटाबंदीच्या काळातील अव्यवस्थेचे चित्र उभे राहिले. मात्र, त्या काळातील काही भयावह नियमांची पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न यंदा रिझर्व्ह बँकेने केला आहे. दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी तसेच बँकेतून त्या बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देतानाच त्यासाठीचे नियमही सुलभ करण्यात आले आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडियाने शनिवारी देशातील आपल्या सर्व मुख्य कार्यालयांना पत्रक पाठवून याविषयी अधिक स्पष्टता आणली. यानुसार २० हजार रुपये मूल्याच्या दोन हजारांच्या नोटा बदलताना बँकेमध्ये कोणतेही ओळखपत्र, अर्ज किंवा अधिग्रहण पत्राची मागणी करण्यात येणार नाही. आपल्याच खात्यात कमाल किती मूल्याच्या दोन हजारांच्या नोटा जमा करायच्या याबाबत रिझर्व्ह बँकेने कोणतेही बंधन घातलेले नाही. मात्र त्यासाठी खातेदाराला ‘केवायसी’ व अन्य विहित नियमांची पूर्तता करावी लागणार आहे, असे या पत्रकात म्हटले आहे. एका वेळेला प्रत्येकाला २० हजार रुपयांच्याच नोटा बदलण्याचे बंधन असले तरी, एकदा नोटा बदलून झाल्यानंतर प्रत्येक वेळी नव्याने रांगेत उभे राहून पुन्हा २० हजार रुपयांपर्यंतच्या मूल्याच्या नोटा बदलता येतील, असेही स्टेट बँकेच्या सूत्रांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *