ताज्याघडामोडी

सुट्टीचा शेवटचा दिवस ठरला अखेरचा, ड्युटीवर रुजू होण्याआधीच पोलिसाने आयुष्य संपवलं

शहरातील मसरूळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवराम भाऊराव निकम (वय ५७ वर्ष, रा. म्हसरुळ, नाशिक) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेला सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

निकम हे आजारपणामुळे गेल्या काही दिवसांपासून रजेवर होते. कर्तव्यावर हजर होण्याच्या एक दिवस आधीच त्यांनी आत्महत्या करत जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे निकम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार आणि पोलीस दल यांच्यावर शोककळा पसरली आहे.

निकम यांनी पोलिस आयुक्तालयातील पंचवटी, सरकारवाडा, शहर वाहतूक तसेच विशेष शाखेत सेवा बजावली होती. काही महिन्यांपासून ते नाशिक शहरातील म्हसरुळ पोलिस ठाण्यात कार्यरत होते. निकम हे अत्यंत प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाचे होते.

या प्रकरणी म्हसरुळ पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिवराम निकम यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. निकम यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसून पोलिस तपासात आजारपणामुळे निकम यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *