ताज्याघडामोडी

राज्यातील या भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार; पुढील काही दिवस असं असेल वातावरण

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. काही ठिकाणी तर गारपीटही झाली असून यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर अवकाळी पावसाचा मारा थांबावा, यासाठी बळीराजाची प्रार्थना सुरू आहे. अशातच कोकण आणि विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण या दोन विभागांत पुढील काही दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता नसल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, पुणे येथील निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह कोकणातील ४ जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या, तर विदर्भातील ११ जिल्ह्यांत उद्यापासून ३ दिवस अवकाळी वातावरणापासून सुटका मिळू शकते. त्यानंतरच्या २ ते ३ दिवसात म्हणजे शनिवार १५ एप्रिलपर्यंत अवकाळी वातावरण जाणवेल.

कोकण आणि विदर्भात वातावरण निवळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी इतर भागांमध्ये मात्र अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पुढील पाच दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे खानदेश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात आणि संपूर्ण मराठवाड्यात शनिवार १५ एप्रिलपर्यंत अवकाळी वातावरणाची शक्यता जाणवते. मात्र गारपीट होण्याचा धोका कमी आहे, अशीही माहिती माणिकराव खुळे यांच्याकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, १६ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे वातावरण निवळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचा फटका सहन करत असलेल्या बळीराजाला साधारण आठवडाभरानंतर पूर्णत: दिलासा मिळू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *