शहरात किरकोळ कारणातून जीवघेणे हल्ले सुरूच आहेत. पुन्हा एकदा पंचवटी परिसरातील पेठरोड भागात कौटुंबिक वादातून हल्ला झाल्याचं समोर आलं आहे. जावयाने सासूसह तिच्या मानलेल्या मुलीवर धारदार विळ्याने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुणीला गंभीर दुखापत झाली असून सासू देखील जखमी झाली आहे. आरती वालझाडे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. या दोघींवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नाशिकच्या पंचवटी परिसरात असलेल्या पेठरोड दिंडोरी नाका येथील अभिषेक स्वीट्समागे ही घटना घडली आहे. या हल्ल्यात आरती वालझाडे ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. अरुणा एकनाथ लोखंडे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा जावई असलेला संशयित आरोपी मनोहर सोमनाथ मोंढे याचे पत्नीसोबत कौटुंबिक वाद आहेत. या वादास आरती वालझाडे कारणीभूत असल्याचा आरोप करीत जावई मनोहर मोंढे व अरुणा यांचा मुलगा मनिष एकनाथ लोखंडे यांनी आरतीवर हल्ला केला. मनोहरने विळ्याने वार केल्याने आरतीला गंभीर दुखापती झाल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच पंचवटीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली. पंचवटी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मनोहर सोमनाथ मोंढे, मनीष एकनाथ लोखंडे या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.









