ताज्याघडामोडी

एसटी चालक पतीला सुट्टी मिळेना; पत्नी डेपोत आंदोलनला; आता पतीवर भलतंच कारण देत कारवाई

एसटी चालक पतीला सुट्टी दिली नाही म्हणून पत्नीने सांगलीच्या आटपाडी येथील एसटी आगार प्रमुखांच्या केबिनसमोर झोपून आंदोलन केलं. यानंतर संबंधित महिलेवर एसटी आगाराकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता थेट एसटी चालकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विलास कदम असं या एसटी चालकाचं नाव आहे.

सांगली आटपाडी येथील एसटी आगारामध्ये विलास कदम एसटी चालक म्हणून गेल्या ३३ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी आजारी असल्यानं त्यांनी १२ आणि १३ मार्चला सुट्टी मिळावी म्हणून अर्ज केला होता. मात्र तो अर्ज नाकारण्यात आला. त्यानंतर विलास कदम ड्युटीवर निघून गेले. मात्र पतीला सुट्टी देत नसल्याच्या कारणातून चालक कदम यांच्या पत्नी नलिनी कदम यांनी थेट आटपाडी एसटी आगार प्रमुखांच्या केबिन समोर झोपून आंदोलन केलं होतं. या घटनेमुळे एसटी प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली.

एसटी प्रशासनाकडून संबंधित महिलेच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर आता एसटी प्रशासनाकडून थेट एसटी चालक कदम यांच्यावरदेखील कारवाई करण्यात आली आहे. विलास कदम यांना सेवेतून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. एसटी चालवत असताना मोबाईलवर बोलल्याचा ठपका ठेवत एसटी विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. पुढील आदेश येईपर्यंत कदम यांनी रोज सकाळी १० वाजता एसटी आगारात येऊन हजेरी लावून, कार्यालयीन वेळेत एसटी आगार प्रमुखांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडून जाऊ नये, असे आदेश जारी केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *