गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चपलांची रॅक पॅसेजमध्ये का ठेवली? नवरा-बायकोच्या बेदम मारहाणीत शेजाऱ्याचा मृत्यू

इमारतीच्या कॉमन पॅसेजमध्ये चपलांची रॅक ठेवण्यावरुन झालेल्या भांडणात एका ५४ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मीरारोडमध्ये घडली आहे. मीरारोड येथील अस्मिता डॅफोडिल्स कॉम्प्लेक्समध्ये हा प्रकार घडला. या इमारतीच्या बी विंगमध्ये चौथ्या मजल्यावर रुपानी आणि खत्री कुटुंबीय राहतात. त्यांचे फ्लॅटस एकमेकांसमोर आहेत. या दोन्ही घरांच्या मधील भागात असणाऱ्या कॉमन पॅसेजमध्ये खत्री कुटुंबीयांनी चपलांची रॅक ठेवली होती.

मात्र, समोरच्या घरात राहणाऱ्या समीर रुपानी आणि झैनाब रुपानी यांनी चपलांचा रॅक पॅसेजमध्ये ठेवायला विरोध केला. यावरुन दोन्ही कुटुंबीयांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणादरम्यान समीर आणि झैनाब यांनी अधिकारी खत्री यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत अधिकारी खत्री यांचा जागीच मृत्यू झाला. या सगळ्या प्रकारानंतर समीर फरार झाला असून पोलिसांनी झैनाबला अटक केली आहे. तिला ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. चपलांच्या रॅकवरून समीर आणि झैनाबने अधिकारी खत्रींशी वाद घालायला सुरुवात केली. त्यावर अधिकारी खत्रीही यांनीही प्रत्युत्तर दिले. हा वाद विकोपाला जाऊन समीर आणि झैनाबने अधिकारी खत्री यांना मारहाण करायला सुरुवात केली. समीर आणि झैनाबने खत्री यांना एकापाठोपाठ बुक्के लगावत मारहाण केली. या दोघांनी खत्रींच्या तोंडावर सतत प्रहार केले.

हा सगळा गोंधळ ऐकून इमारतीमधील इतर लोक त्याठिकाणी आले आणि मध्ये पडत अधिकारी खत्री यांना रुपानी दाम्पत्याच्या तावडीतून सोडवले. मात्र, या मारहाणीत अधिकारी खत्री यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे खत्री यांच्या तोंडातून फेस यायला सुरुवात झाली. हे पाहून कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच अधिकारी खत्री यांचा मृत्यू झाला होता.

खत्री यांच्या तोंडाला फेस आल्याचे पाहून हा प्रकार गंभीर असल्याचे समीर रुपानीच्या लक्षात आले. त्यामुळे इमारतीमधील लोक खत्रींना घेऊन रुग्णालयात गेल्यानंतर समीरने पळ काढला. मात्र, झैनाब रुपानी घरातच थांबून राहिली. अधिकारी खत्री यांच्या मृत्यूनंतर पोलिसांना वर्दी देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी झैनाब रुपानीला अटक केली. नया नगर पोलिसांनी समीर आणि झैनाब या दोघांवरही खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या समीरचा कसून शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *