जालना: जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील गोकुळ गावात काल धक्कादायक घटना घडली. हसत्या खेळत्या पालोदे कुटुंबासह गोकुळ गावावर शोककळा पसरली.पुतण्याला पाहण्यासाठी आलेल्या मुलीकडाच्या पाहुण्यांसमोरच मुलाच्या काकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटकयाने निधन झाले.शेणफड पालोदे (वय ६२) असे त्यांचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील गोकुळ येथे घडली.
जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील गोकुळ येथील उत्तम पालोदे यांच्या मुलाच्या लग्न जुळवण्यासाठी गेल्या काही प्रयत्न सुरु होते.शेजारच्या सिल्लोड तालुक्यातील राहिमाबाद येथील मुलीसोबत त्याची सोयरिक जुळून आली होती.सोयरिक जुळण्याआधी मुलाचे घरदार तसेच मुलगा बघण्यासाठी मुलीकडची काही मंडळी गोकुळ गावात उत्तमराव पालोदे यांच्या घरी काल सोमवारी सकाळी आली होती. मुलीकडची मंडळी सोयरिक जुळवण्यासाठी आली म्हणून पालोदे कुटुंबियातील ज्येष्ठ व्यक्ती,मुलाचे काका म्हणून पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी उत्तम पालोदे यांचे मोठे भाऊ शेणफड पालोदे हे देखील या सोयरिकीच्या कार्यक्रमास हजर होते.
पाहुणेमंडळी घरी आल्यानंतर दोन्ही बाजूच्या मंडळींच्या गप्पा सुरू झाल्या.कुटुंबाची ख्याली खुशाली विचारून झाली. काहीवेळाने पाहुण्यांना चहा देण्यात आला आणि गप्पांचा फड आणखी रंगला. त्यावेळी मुलाचे काका शेणफड यांच्या छातीत त्रास सुरु झाला. बोलता बोलताच काही कळायच्या आत ते त्याच ठिकाणी पलंगावर कोसळले. काय झालं म्हणून उपस्थित नातेवाईकांनी धाव घेतली. पण शेनफड पालोदे यांची जागेवरच प्राणज्योत मालवली होती. क्षणात हसत्या खेळत्या पालोदे कुटुंबियांवर झालेल्या आघातामुळे गोकुळ गावावर शोककळा पसरली. शोकाकुल वातावरणात शेणफड पालोदे यांच्या पार्थिवावर सोमवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ,एक मुलगा,एक मुलगी सून नातवंडे असा परिवार आहे.