ताज्याघडामोडी

ब्यूटी स्पामध्ये मसाज घेण्याच्या बहाण्याने गेले पोलीस, आतमध्ये जाताच हादरले; ५ मुलींची सुटका…

पिंपळे- सौदागर येथील काटेवस्तीत असलेल्या ‘एज लाइन टच द ब्यूटी’ या स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा मारून कारवाई केली आहे. यात मिझोराम राज्यातील एक आणि महाराष्ट्रातील चार अशा ५ तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या स्पाचा मॅनेजर शाकीर समीरुद्दीन अहमद (वय २६, रा. पिंपळे-सौदागर, मूळचा आसाम) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह पांडे चंकी धर्मेंद्र (वय २२, रा. काळेवाडी), मंगेश भगवान जाधव (वय ३५, रा. हिंजवडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महिला पोलिस हवालदार सुधा टोके यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शाकीर हा काटेवस्ती येथे स्पा सेंटर चालवत होता. त्याने काही तरुणींना पैशांचे आमिष दाखवून या स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसायासाठी त्यांना प्रवृत्त केल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली.

यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरवर बनावट गिऱ्हाईक पाठवून माहितीची खातरजमा केली. त्यामध्ये स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री झाली. पोलिसांनी छापा मारून पाच तरुणींची सुटका केली. स्पा सेंटरजवळ दोन रुग्णालये आणि एक शाळा आहे. रुग्णालये आणि शाळांच्या बाजूला हा प्रकार सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाइल, पेटीएम स्कॅनर आणि इतर साहित्य असा ११ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *