ताज्याघडामोडी

जातीमुळे लग्नाला नकार, दोघांनी झोपेच्या १५ गोळ्या घेतल्या, त्यातून वाचले, घरच्यांनी लग्न लावलं..!

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं नि आमचं अगदी सेम असतं… या ओळी प्रत्येक प्रेम प्रकरणात लागू होतीलच, असं नाही. प्रत्येकाचं प्रेम काही सारखं नसतं. प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट ही वेगळी असते. प्रत्येकाला आपलं प्रेम आयुष्यात मिळतं असं नाही. अनेक प्रेमीयुगुलांना कुटुंबीयांकडून विरोधही होतो. त्यातूनच आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल प्रेमयुगुलांकडून उचललं जातं. मग या प्रेमाला पूर्णविराम लागतो. पण पूर्णविराम लागूनही खरे प्रेमीयुगुल आशा सोडत नाहीत. ते कुटुंबियांचा विरोध झुगारुन आपली नौका पैलतिरी नेतातच. अशीच एका प्रेमाची खास गोष्ट आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. त्यांची अनोखी लव्हस्टोरी चांगलीच चर्चेत राहिली. ही ‘लव्हस्टोरी’ आहे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील… ‘ऋषिकेश’ आणि ‘श्वेता’ असं या चर्चेतल्या कपलचं नाव… ३ वर्ष प्रेमाच्या आणा-भाका घेतल्यानंतर दोघांच्या लग्नासाठी कुटुंबियांकडून प्रचंड विरोध झाला. घरच्यांचा विरोध असल्याने ऋषिकेश आणि श्वेताने सोबतच झोपेच्या गोळ्या घेतल्या. पाच ते सहा दिवस दोघांवरही उपचार सुरु होते. इथूनचं पुढं त्यांच्या आयुष्याला सुखदायी वळण लागलं. पोरांचं एकमेकांवरती असलेलं प्रेम पाहून घरच्यांचं मनपरिवर्तन झालं.

ऋषिकेश हिंगणकर हा मराठा पाटील तर श्वेता मोरे ही कुणबी पाटील समाजाची. दोघांमध्ये पाटील समाज कॉमन आहे. परंतु समाजामध्ये वेगवेगळे प्रकार असल्याने सोयरीक जमणं अशक्य. ऋषिकेशला या सर्व गोष्टींची अगोदरच कल्पना होती. म्हणून दोघांनी काही दिवसातच रजिस्टर कोर्ट मॅरेज करून ठेवलं होतं. श्वेता हिला मोठी बहीण असल्यामुळे तिचं आधी लग्न होऊ देऊ. त्यानंतर याची माहिती कुटुंबियांना देऊ, असा निर्णय त्यांनी घेतला. यादरम्यान दोघेही एकमेकांना लपून-छपून भेटू लागले. कुणालाही लग्न केल्याचं कळू दिलं नाही. काही दिवस आरामात निघून गेले.

काही दिवसानंतर श्वेताच्या कुटुंबियांना त्यांच्या लग्नाची कुणकुण लागली अन् तिला घरी बोलावून घेतलं. श्वेताला लग्नासंदर्भात विचारणा झाली. तिने ऋषिकेशवर प्रेम असल्याचं कुटुंबियांना स्पष्ट सांगितलं. त्याचंही माझ्यावर प्रेम असल्याचं तिने घरच्यांना सांगितलं. तिच्या कुटुंबीयांनी या प्रेमाला तीव्र विरोध केला. श्वेताचं कॉलेज-फोन-बाहेर फिरणं सर्व काही तात्काळ बंद करण्यात आलं. अनेक दिवस दोघांचं बोलणंही पूर्णतः बंद होतं. ऋषिकेशने ही बाब त्यांच्या कुटुंबियांना सांगितली. परंतु हे लग्न आता अशक्य असल्याचं त्याचं कुटुंबही म्हणालं. तोपर्यंत त्यांच्या प्रेमाची चर्चा पूर्ण अकोट शहरात सुरु झाली होती. कसं तरी ऋषिकेशचं कुटुंब लग्नासाठी तयार झालं आणि तिचा हात मागायला श्वेताच्या घरी गेलं.

ऋषिकेशचं कुटुंब श्वेताच्या घरी पोहोचलं. अनेक मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवले परंतु तिच्या कुटुंबियांकडून लग्नाला विरोधच होता. त्यात श्वेताचं कॉलेजही बंद करण्यात आलं होतं. त्यामुळे तिला घराबाहेर जाणंही अशक्य. काही दिवसानंतर तिच्या हाताला मोबाईल लागला आणि तिने लागलीच ऋषिकेशला फोन केला. सर्व प्रसंग ऋषिकेशच्या कानावर टाकला. तेव्हा ऋषिकेश हा औषधांच्या दुकानावर काम करत असायचा. त्यामुळे त्याला औषधांची चांगलीच माहिती होती. आपण सोबत राहू शकत नाही, तर काय झालं सोबत जाऊ शकतोय… असं म्हणत तिला झोपेच्या गोळ्या संदर्भात त्याने माहिती दिली. झालं… दोघांचाही प्लॅन ठरला… तिने झोपेच्या गोळ्या घेतल्या. ठरल्याप्रमाणे एकसाथ १५ गोळ्या प्राशन केल्या. इकडे ऋषिकेशने १५ गोळ्या घेतल्या. दोघांनीही एकाचवेळी झोपेच्या गोळ्या खाल्ल्याने दोघांचीही प्रकृती खालावली. तातडीने त्यांना अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पुढे पाच ते सहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. सुदैवाने दोघेही त्यातून सुखरुप वाचले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *