ताज्याघडामोडी

बायकोला ऑफिसला सोडून आला, घरी आल्यावर नवविवाहीत तरुणाने उचललं धक्कादायक पाऊल

पुण्यात किरकटवाडी येथे एका नवविवाहीत तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकटवाडी येथील भैरवनाथ नगर येथे ही घटना घडली आहे. ही घटना दुपारच्या सुमारास घडली असल्याचं सांगण्यात येत आहे.

उत्तम सखाराम धिंडले (वय २७, भैरवनाथ नगर, किरकटवाडी, ता. हवेली, मुळ रा. घिसर, ता. वेल्हे) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो एका खासगी फायनान्स कंपनीत रिकव्हरीचं काम करत होता. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पुढील तपासणी करता पाठवला आहे. या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी काही दिवसांपासून उत्तम हा तणावात असल्याचं सांगण्यात येत आहे.

प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम धिंडले याचा काही दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. उत्तम हा एका खासगी फायनान्स कंपनीत रिकव्हरीचं काम करायचा. शेजारी राहणाऱ्या मित्रांशी तो कामावरून येत जात असताना नेहमी बोलत असे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून तो कुणाशी काही बोलत नव्हता. त्याची पत्नी देखील खासगी कंपनीत काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

काल उत्तम आपल्या पत्नीला सोडून पुन्हा घरी आला. संध्याकाळी पत्नी कामावरून घरी आल्यावर पत्नीने दार ठोठावले. मात्र, आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. पत्नीला शंका आल्याने तिने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. दरवाजा तोडून आता गेल्यानंतर उत्तम याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं. उत्तम धिंडले याने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. नवीनच लग्न झालं असल्याने पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उत्तम हा सर्वांशी मिळून मिसळून राहत होता. अचानक ही घटना घडल्याने पत्नीला आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *