ताज्याघडामोडी

ऊस तोडा, नाहीतर पेटवून देवू; उत्पादक शेतकऱ्यांचे उपमुख्यमंत्र्यांना साकडे

नाशिक साखर कारखाना २०१३ पासून बंद आहे. या कारखान्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध आहे.

या क्षेत्रातील उभ्या उसाची तोड पूर्ण होईपर्यंत आजुबाजूच्या साखरकारखान्यांचे गाळप बंद करण्यात येवू नये, अशी मागणी ‘नासाका’चे माजी चेअरमन तानाजी गायधनी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

संपूर्ण ऊस तोडला नाही तर शेतकऱ्यांवर संपूर्ण क्षेत्र पेटविण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, अशी हतबलताही गायधनी यांनी पत्राद्वारे पवार यांच्याकडे व्यक्त केली आहे.

नासाका गेल्या नऊ वर्षांपासून बंद आहे. असे असले तरी या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली आहे. गेल्या काही वर्षांपासून नासाका कार्यक्षेत्रातील ऊस कोपरगाव, संजीवनी, अगस्ती, कादवा, प्रवरा, संगमनेर हे कारखाने घेत होते. मात्र यंदाच्या गळीत हंगामात नासाका कार्यक्षेत्रात दीड वर्ष उलटलेला सुमारे दीड लाख मेट्रिक टन ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत आहे.

त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्यातच या साखर कारखान्यांनी पाठविलेले ऊसतोड मजूर माघारी नेले आहेत. जे काही मजूर सध्या नासाका कार्यक्षेत्रातील ऊस तोडण्यासाठी उपलब्ध आहेत, ते देखील २५ फेब्रुवारीपर्यंतच काम करणार आहेत.

परिणामी या कारखान्याच्या क्षेत्रातील नाशिक, इगतपुरी, सिन्नर आणि त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांतील हजारो हेक्टर क्षेत्रावरील उभ्या ऊसाची तोड होऊ शकणार नाही. शेतकऱ्यांकडून ऊस तोडणीसाठी जादादरोन मजुरी उकळली जात आहे. काही ठराविक शेतकऱ्यांचाच ऊस तोडण्यास आतापर्यंत या कारखान्यांनी प्राधान्य दिले आहे.

शेतकऱ्यांचे हाल थांबविण्यासाठी संपूर्ण उसाची तोड होईपर्यंत मजूर देण्याचे आणि साखर कारखान्यांचे गाळप बंद न करण्याचे आदेश कोपरगाव, संजीवनी, अगस्ती, कादवा, प्रवरा, संगमनेर या साखर कारखान्यांना देण्याची मागणी तानाजी गायधनी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. तसे न झाल्यास नासाका कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आपल्या शेतातील ऊस पेटविण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नसल्याची वस्तुस्थितीही गायधनी यांनी कळविली आहे.

नासाका सुरू करा

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘नासाका’ सुरू करा, असे साकडेही गायधनी यांनी अजित पवार यांना घातले आहे. हा साखर कारखाना कोणत्या राजकीय पक्षाचा नेता चालविण्यास घेतो यापेक्षा साखर कारखाना सुरू होणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे नासाका सुरू करण्याची प्रक्रिया जलद गतीने राबविण्याचे आदेश जिल्हा बँकेस देण्याची मागणीही गायधनी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *