ताज्याघडामोडी

फ्रेंड रिक्वेस्ट पडली महागात, आधी चॅटिंग, नंतर तरुणीला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

समाज माध्यमं जितकी फायद्याची, तितकीच धोकादायक असल्याची प्रचिती आणणाऱ्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहे. त्यातल्या त्यात मुलींसाठी सोशल मीडिया किती घातक ठरु शकतं, याचीही अनेक उदाहरणं आहेत. असंच एक उदाहरण आता नाशिकमधून समोर येत आहे. नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्या अंतर्गत समाज माध्यमांचा वापर करून एका मुलीचा विनयभंग करण्यात आला आहे.

नाशिकमधून समोर आलेली ही घटना अत्यंत खळबळजनक आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी या संदर्भात तक्रार दिली असून पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, तक्रारदाराची मुलगी आपल्या मोबाईलवर स्नॅपचॅट अॅपचा वापर करत होती. ती आपल्या अकाऊंटवर स्वतःचे फोटो शेअर करायची, तर कधी मित्र मैत्रिणींशी चॅटिंग देखील करायची.

दरम्यान पीडित मुलीला एकदा एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून मेसेज आला. तिने देखील कोणीतरी ओळखीचं किंवा शाळेतील मित्र मैत्रीण असावं, म्हणून पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर ती संबंधित व्यक्तीसोबत चॅटिंग करू लागली. त्यानंतर एकदा या अनोळखी व्यक्तीने पीडित मुलीचा नग्न व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. संतापजनक म्हणजे या संशयित आरोपीने व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या अकाऊण्टवर व्हायरल देखील केले.

या प्रकरणी मुलीच्या अजाणतेपणाचा फायदा घेऊन तिचा विनयभंग करत व्हिडिओ स्नॅपचॅट आणि इंस्टाग्राम अकाऊण्टवर व्हायरल केल्याच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीची कुठलीही माहिती नसून सध्या त्याचा फक्त मोबाईल नंबर पोलिसांच्या हाती आहे. त्यानुसार पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *