ताज्याघडामोडी

मी काँग्रेसकडूनच उमेदवारी अर्ज भरला होता, पण…. सत्यजीत तांबेंच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत माझा विजय हा अगोदरच झाला आहे. आता फक्त मला मताधिक्य किती मिळणार हे बघायचे आहे, असे सांगत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी आपल्या विजयचा विश्वास व्यक्त केला. सत्यजीत तांबे यांनी संगमनेर येथील मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावला. तत्पूर्वी भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सत्यजीत तांबे यांच्या पाठिशी आपली ताकद उभी करत त्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली. यानंतर सत्यजीत तांबे यांनी विजयाचा १०० टक्के विश्वास व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया पुन्हा एकदा उंचावल्या आहेत.

यावेळी त्यांनी काँग्रेसमधील काही नेत्यांना अप्रत्यक्षपणे इशाराही दिला. मी अपक्ष उमेदवार आहे, भविष्यातही मी अपक्षच राहीन. मात्र, गेल्या काही दिवासंमध्ये माझ्या परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न झाला. आम्ही इतकी वर्षे काँग्रेस पक्षात असल्यामुळे या सगळ्यावर प्रतिक्रिया किंवा प्रत्युत्तर दिले नाही. पण मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला ही माहिती चुकीची आहे. मी फॉर्म भरताना काँग्रेसचा उमेदवार म्हणूनच अर्ज भरला होता. तीन वाजेपर्यंत मला एबी फॉर्म मिळाला नाही. त्यामुळे माझा फॉर्म अपक्ष म्हणून कन्व्हर्ट झाला. त्यामुळे मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याच्या बातम्या खोट्या आहेत. कोरा एबी फॉर्म देऊनही सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेवारी अर्ज भरला, हा प्रचार खोटा आहे.

काँग्रेसमधील काही नेते अर्धसत्य सांगत आहेत. मी योग्य वेळ आल्यावर पूर्ण सत्य सांगेन, तेव्हा सगळे चकित होतील. राजकारणात योग्य वेळ कधी येईल,ते सांगता येत नाही, असे सत्यजीत तांबे यांनी म्हटले. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल २ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. यानंतर सत्यजीत तांबे कोणता गौप्यस्फोट करणार का, हे पाहावे लागेल.

नाशिक पदवीधर मतदारसंघात गेली १४ वर्षे माझ्या वडिलांनी प्रतिनिधित्व केले आहे. या काळात आम्ही पक्षीय भेदाभेद विसरुन काम केले आहे. आम्ही या काळात अनेक ऋणानुबंध निर्माण केले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मला १०० पेक्षा जास्त संघटनांचा पाठिंबा आहे. सगळ्याच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. हे सगळे चित्र बघून माझे मन भरुन आले आहे. येणाऱ्या काळात मी जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करेन. आगामी काळात मी अपक्ष म्हणूनच काम करेन, असेही सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *