ताज्याघडामोडी

चौपाटीवरील गर्दीसमोरच अचानक महिला शिक्षिकेने पाण्यात उडी घेत जीवन संपवलं

जालना शहरातील मोती तलावाच्या चौपाटीवरून स्वतःला तलावात झोकून देत काल शनिवारी दुपारच्या सुमारास एका ४५ वर्षीय विवाहित शिक्षिकेने आत्महत्या केली आहे. या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली. जयश्री गणेश पोलास असं आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव असून त्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असल्याचे समजते. त्यांचे पती गणेश पोलास हे नायब तहसीलदार असून त्यांना २ मुलेही आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काल शनिवार असल्याने दुपारी मोतीबाग परिसरातील चौपाटीवर नागरिकांची चांगलीच गर्दी होती. तलावाच्या भिंतींवर बरेच नागरिक बसलेले होते. अशातच जयश्री पोलास यादेखील चौपाटीवर पोहोचल्या. त्यांनी चौपाटीवरील भिंतीवरून स्वतःला तलावात झोकून दिले. त्यांच्या बाजूला उभ्या असलेल्या लोकांनी मोठी आरडाओरड सुरू केली.

एका महिलेने तलावात उडी मारल्याचे लक्षात येताच कुणीतरी चंदनझिरा पोलिसांना फोन केला. ही घटना कळताच चंदनझिरा पोलिसांनी मोती तलावाकडे धाव घेतली व मृतदेह बाहेर काढून पंचनामा करीत उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला.

जयश्री पोलास या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका तर त्यांचे पती गणेश पोलास हे महसूल खात्यात नायब तहसीलदार आहेत. सुखवस्तू, सुशिक्षित कुटुंबातील या महिलेने टोकाचा निर्णय का, घेतला यावरून शहरात दबक्या आवाजात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे पोलीस तपासात याबाबत नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *