ताज्याघडामोडी

जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी करुणा शर्मांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल; धनंजय मुंडेंवरही गंभीर आरोप

फेसबुक पोस्ट का केली म्हणून, एकाला त्यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शर्मा यांच्याविरोधात परळीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे करुणा शर्मा यांनी देखील आपल्याला धमकी देण्यात आली असल्याची तक्रार पोलीस अधीक्षक कार्यालयात केली आहे. 

नेहमीच चर्चेत असणाऱ्या करुणा शर्मा सतत फेसबुकवर सक्रीय असतात. तसेच त्या वेगवेगळ्या पोस्ट देखील करत असतात. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. त्यावर अनेक कमेंट देखील आल्या होत्या. पण याच पोस्टवर कमेंट का केली म्हणून करुणा शर्मा यांनी आपल्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार परळी शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. तर याच तक्रारीनंतर करुणा शर्मा यांच्यासह एकाविरुद्ध परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता शर्मा यांची आणखी अडचण वाढण्याची शक्यता आहे. 

बीडच्या परळी शहरातील पंचवटीनगर परिसरात राहणारे बालाजी ज्ञानोबा दहिफळे यांनी करुणा शर्मा यांच्याविरुद्ध परळी शहर पोलिसात तक्रार केली आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, काही दिवसांपुर्वी फेसबुकवर करुणा शर्मा यांनी एक पोस्ट केली. त्यांच्या या पोस्टवर मी कमेंट केली होती. मात्र त्यानंतर 22 जानेवारीला रात्री 9.40 वाजता करुणा शर्मा यांनी दहिफळेंना फोन केला. तसेच, फोन करत “तु माझ्या फेसबुक पोस्टवर कमेंट का केली म्हणून शिविगाळ केली.

तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, असल्याचं दहिफळे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. सोबतच करुणा शर्मा यांच्या फोनवरुनच अजयकुमार देडे यांनीही आपल्याला शिवीगाळ केली असल्याचं दहिफळे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या याच फिर्यादीवरुन परळी शहर पोलिस ठाण्यात करुणा शर्मा आणि अजयकुमार देडे यांच्याविरोधात कलम 507, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करुणा शर्मा यांच्या विरोधात शिवीगाळ करून, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दुसरीकडे शर्मा यांनी देखील, आपल्याला फोनवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार पोलिसात केली आहे. ज्यात, राजकारण सोडून दे, अन्यथा तुला जाळून जिवे मारून टाकू, अशी धमकी आपल्याला दिल्याच करुणा शर्मा यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी करुणा शर्मा यांनी बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे धाव घेतली होती. मात्र त्यांची भेट होऊ शकली नसल्याने, त्यांनी फोनवरून ठाकूर यांच्याशी संपर्क साधला होता. तसेच आपल्या जिवाला धनंजय मुंडे, राजश्री मुंडे, तेजस ठक्कर, राज घनवट, पुरुषोत्तम केंद्रे आणि बालाजी डोईफोडे यांच्यापासून धोका असल्याचं करुणा शर्मा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *