ताज्याघडामोडी

रूढी परंपरेला फाटा देत नातींनी आजोबांच्या पार्थिवाला खांदा अन् स्मशानभूमीमध्ये मुखाग्नी दिला

पाथर्डी तालुक्यात शिवसेनेची पहिला शाखा काढणाऱ्या किसनराव पालवे यांचे वयाच्या 94व्या वर्षी नुकतेच निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार चार नातींनी त्यांच्या पार्थिवाला खांदा अन् स्मशानभूमीमध्ये मुखाग्नी दिला.

शिवसेनेची शाखा उदघाटनाला परवानगी मिळावी म्हणून किसनराव पालवे यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. 1990 साली पाथर्डी मतदारसंघातून शिवसेनेकडून रामदास गोल्हार उमेदवार म्हणून उभे राहिले असताना किसनराव पालवे यांनी त्यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात फिरत त्यांनी शिवसेनेची विचारधारा लोकांना पटवून दिली होती.

पालवे हे वीर सावरकर व शिवसेना प्रमुखांना मानत होते. श्रीमद्भगवद्गीतेचे 700 श्लोक त्यांचे तोंडपाठ होते. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी एकूण सहा नोकऱ्या केल्या. 1963 साली त्यांनी गावात झालेले धर्मांतरही रोखले होते.

पालवे यांना संभाजी पालवे, भरत पालवे, जनताराम पालवे व राणाप्रताप पालवे अशी चार मुले असून मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या मुलांना माझे अंत्यसंस्कार तुम्ही न करता माझ्या सुनांनी किंवा नातीने करावेत तसेच धार्मिक विधी सुद्धा करायचे नाहीत असे सांगितले होते. त्यांच्या इच्छेनुसार अखेर त्यांच्या चार नाती शर्वरी संभाजी पालवे, प्राची भरतराम पालवे, श्रेया राणाप्रताप पालवे, राजलक्ष्मी जनताराम पालवे यांनी पालवे यांच्या तिरडीला खांदा दिला व स्मशानभूमीत अग्निसंस्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *