ताज्याघडामोडी

निवडणूक झाली, मिरवणुकीत तलवारी नाचवल्या, मतदान न केल्याने एकाला रक्त निघेपर्यंत मारहाण

उपसरपंचपदाच्या निवडीनंतर आनंदित झालेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या गाव कारभाऱ्यांसाठी विजयी मिरवणूक काढली. मात्र मिरवणुकीत त्यांनी नंग्या तलवारी नाचवून अप्रत्यक्ष दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. आमचा नेता पॉवरफुल्ल गाण्यावर थिरकताना प्रतिस्पर्ध्यांवर जरब बसले यासाठी त्यांनी मिरवणुकीत तलवारी नाचवल्या. बरं प्रकरण एवढ्यावरही थांबलं नाही तर गावगुंडांनी एकाला रक्त निघेपर्यंत मारहाणही केली.

सरपंच पदासाठी आमच्या उमेदवाराला मतदान का केलं नाही? असं म्हणत एकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली. ही घटना नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यागील मनूला या गावी घडली. या प्रकरणी नूतन उपसरपंचांसह नऊ जणांविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

उपसरपंचपदी विराजमान झाल्यावर मिरवणूक काढण्याकरिता संबंधितांनी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. विना परवानगी मिरवणूक तर काढली पण अतिउत्साही टोळक्यांनी मिरवणुकीत तलवारी नाचवल्या. जाळावर तलवारींच्या पाती गरम करुन त्या नाचवण्यास तरुणांनी मागे पुढे पाहिलं नाही. हा सगळा प्रकार सुमारे २० मिनिटे सुरु होता.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे पडसाद आणि वादावादी समोर येण्यास सुरुवात झाली आहे. कुठे दोन पॅनल तर कुठे तीन पॅनलमध्ये लढती झाल्या असून निवडणुकीतील खुन्नस आत्ता काढली जातीये. हदगाव तालुक्यातील मनूला या गावात असाच प्रकार घडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *