ताज्याघडामोडी

शिक्षकाकडून शरीरसुखाची मागणी, घरी जात नवऱ्यासमोरही धमकी, मुख्याध्यापिकेचं टोकाचं पाऊल

देवपुरातील एका शाळेच्या मुख्याध्यापिकेने विषप्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर संतप्त भाजपा महिला मोर्चाने त्या शाळेत धडक देत आंदोलन केले. एवढे घडूनही संस्थेने दखल न घेतल्याने निषेध व्यक्त केला आहे.

शिक्षकाकडून शरीरसुखाची वारंवार मागणी केली जात असल्याची तक्रार एका उर्दू शाळेतील मुख्याध्यापिकेने दोन दिवसांपूर्वी पोलिसांत दिली होती. त्यानंतर संबंधित शिक्षक अन्सारी अबुजर मक्सुद अहमद याला पोलिसांनी अटकही केली. परंतु, दुसऱ्याच दिवशी या शिक्षकाला जामीन मंजूर झाला.

सुटका झाल्यानंतर या शिक्षकाने पुन्हा मुख्याध्यापिकेच्या घरी जाऊन पतीसमोर मुख्याध्यापिकेचा एकेरी शब्दात उच्चार केला आणि धमकावल्याचा आरोप आहे. या कारणामुळे मुख्याध्यापिका तणावात होती, त्यातच तिने राहत्या घरीच विषारी पदार्थ प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटने दरम्यान मुख्याध्यापिकेला अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या पतीने एका नामांकित हॉस्पिटल येथे दाखल केले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

या सर्व प्रकरणासंदर्भात महिला मुख्याध्यापकाने काही सामाजिक संघटनांना सोबत घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची भेट घेऊन आपली कैफियत त्यांच्याकडे मांडली होती. दरम्यान आपल्या सोबत घडलेला सर्व घटनाक्रम त्यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्याकडे बोलून दाखवला.

देवपूर परिसरातील एका प्राथमिक उर्दू शाळेत सन २००९ पासून ती पीडित महिला शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. २०११ पासून मुख्याध्यापिका म्हणून तिची नेमणूक झाली आहे. याच शाळेतील उपशिक्षक काही एक कारण नसताना छेड काढण्याचा प्रयत्न करायचा, तसेच शारीरिक सुखाची मागणी करीत होता. या सर्व गोष्टींना नकार दिला होता, त्याच गोष्टीचा राग येऊन या उपशिक्षकाने पीडितेच्या विरुद्ध एसीबीकडे तक्रार करुन खोटी कारवाई केली असल्याचा आरोप महिला मुख्याध्यापकाने केला आहे. तसेच माझी इच्छा पुन्हा पूर्ण कर, तुला प्रकरणातून बाहेर काढतो असे म्हणत पुन्हा त्रास देत होता.

काल या महिला मुख्याध्यापिकेने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तरी त्या उपशिक्षकापासून संरक्षण मिळावे, त्याच्यावर कारवाई करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा त्यांनी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना दिला होता, मात्र नंतर त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *