ताज्याघडामोडी

गोपीचंद पडळकरांना धक्का; भाऊ ब्रम्हानंद पडळकरांसह १०० जणांवर गुन्हा दाखल

सांगली जिल्ह्यातील मिरज शहरातील काही दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या साह्याने मध्यरात्री पाडण्यात आले. यामुळे येथे दोन गटात राडा झाल्याची घटना घडली. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकरांनी हे अतिक्रमण बेकायदेशीरपणे जागेचा ताबा घेण्याच्या उद्देशाने पाडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

प्रकरणी पोलिसांनी आता मोठी करवाई केली असून आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह तब्बल १०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पडळकरांना मोठा दणका बसला आहे.

मिरज शहरातील दोन हॉटेल, एक मेडिकल स्टोअर्स, ट्रॅव्हल ऑफिस, एक घर, पान शॉप अशा दहा मिळकती मध्यरात्री जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आल्या. यामुळे मिरजमध्ये एकच खळबळ उडाली. तर हे अतिक्रमण हटवण्याला स्थानिकांनी विरोध केला असून ब्रह्मानंद पडळकर यांच्या विरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत.

माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर काही आस्थापना पोकलेनने मध्यरात्री पाडण्यात येत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. मात्र पोलीस घटनास्थळी येताच ड्रायव्हर व इतर लोकं पळून गेले. पण तो पर्यंत दहा आस्थापने पाडण्यात आले होते. तर या आस्थापना धारकांपैकी एका व्यक्तीने तक्रार दिली असून विविध कलमांतर्गत ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह इतर १०० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे मिरज शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले या घटनेची पुढील चौकशी पोलीस करत आहेत. तसेच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ब्रह्मानंद पडळकर हे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *