अमरावतीतून एक धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका नराधमाने आपल्या दोन दिवसांच्या बाळाला क्रुर शिक्षा दिली.अमरावतीच्या सावर्डी इथे ही संतापजनक घटना घडली असून या प्रकरणी निर्दयी बापाला पोलिसांनी अटक केली आहे. तर त्या निष्पाप बाळावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अमरावती जिल्ह्यातील सावर्डीचा गिरीश गोंडाणे हा त्याची पत्नी प्रतिक्षाच्या प्रसूतीसाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आला होता. सिकल सेल आणि इतर व्याधीने ग्रस्त असलेल्या प्रतिक्षाची प्रसूती धोकादायकच होती. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली आणि 29 डिसेंबरला प्रसूती झाली. प्रतीक्षाने गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र आधीपासूनच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत प्रतिक्षाला मारहाण करणाऱ्या गिरीशच्या डोक्यातला संशयाचा भूत बळावलं होतं.
31 डिसेंबरच्या रात्री गिरीश बाळाला भेटायला थेट हॉस्पीटलच्या वार्डात शिरला. सुरक्षारक्षकाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण माझा बाळाची तब्बेत गंभीर आहे मला बाळाला भेटायचंच आहे असं सांगून गिरीश प्रतीक्षाच्या बेडपर्यंत पोहोचला. बाळाला हातात घेत गिरीशने अचानक बाळाला जमिनीवर आपटलं. यात अवघ्या दोन दिवसांचा चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला आणि मेंदूला गंभीर स्वरूपाची इजा झाली आहे. त्याचावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.