दारुड्या पतीचा सुपारी देवून पत्नीनेच काटा काढल्याचा प्रकार दहीहंडा पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे. पोलिसांनी यामध्ये मृतकाची पत्नी व तिला 30 हजार रुपयांसाठी साथ देणाऱ्यास अटक केली आहे. सचिन घमराव बांगर असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. ही घटना अकोट तालुक्यातील पुंडा येथे घडली. तर डिगांबर प्रभाकर मालवे असे मारेकरी आरोपीचे नाव आहे. तर कंचन सचिन बांगर असे सुपारी देणाऱ्या पत्नीचे नाव आहे.
जिल्ह्यातील दहिहंडा पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम पुंडा येथे सचिन बांगर यांचा व्यायाम करणाऱ्या लोखंडी अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. ही घटना २८ डिंसेबरला सकाळी उघडकीस आली. दरम्यान, पोलिसांनी मृतदेहासह घटनास्थळाचा पंचनामा केला असता सचिनच्या अंगावर जखमा तसेच दोरीने बांधल्याचे वन दिसून आले. पोलिसांना ही आत्महत्या नसून हत्या असावी असा संशय आला. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली. वैद्यकीय अहवालासह पोलीस तपासात सचिनची हत्या झाल्याचे समोर आले.
तपासावेळी सचिनची पत्नी कंचनची बारकाईने चौकशी करण्यात आली. चौकशीत धक्कादायक बाब उघडकीस आली. पत्नीनेच पती सचिन याच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले. सद्यस्थितीत दहीहंडा पोलिसांनी पत्नी कंचन आणि मारेकऱ्याला अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास दहीहंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत करीत आहेत.