ताज्याघडामोडी

“चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्याचा खटला मोफत लढणार, परंतु…”, मोठ्या वकिलाची घोषणा

भाजपा नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असे गुन्हे दाखल झाले आहेत. यावर मानवाधिकार कार्यकर्ते आणि वकील असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“शाईफेक करणाऱ्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करणे अतिरेकीपणा आहे,” असं मत असीम सरोदे यांनी व्यक्त केलं. तसेच या आरोपीचा खटला आमची टीम मोफत लढेल, अशी घोषणाही केली. त्यांनी रविवारी (११ डिसेंबर) ट्वीट करत आपली भूमिका मांडली.

वकील असीम सरोदे म्हणाले, “शाईफेक प्रकरणात कलम ३०७ म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि १२० ब, शस्त्रास्त्र कायद्याचा वापर करणे यानुसार गुन्हा दाखल करणे अतिरेकीपणा आहे.”

“यंत्रणांच्या मदतीने कायद्याच्या गैरवापराचे हे उदाहरण आहे. त्यामुळे आमची कायदेशीर टीम आरोपींची केस मोफत चालवेल. परंतु, शाईफेकीचा व बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध,” असंही असीम सरोदे यांनी नमूद केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *