ताज्याघडामोडी

मा.आ.प्रशांत परिचारक यांचे जिल्हाधिकारी शंभरकर यांना पत्र

काशी आणि पंढरपुरच्या परिस्थितील भिन्नतेकडे वेधले लक्ष 

उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली वस्तुस्थिती 

मागील दोन महिन्यापासून पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यावरून पंढरपुरात जोरदार मतमतांतरे व्यक्त होत आली.१८ रस्त्यांच्या प्रस्तावित रुंदीकरणास विरोध होत आला.तर नव्यानेच प्रस्तावित केलेल्या मंदिर परिसरातील ६० मीटर रुंदीच्या कॅरिडॉरच्या प्रस्तावामुळे तर मंदिर परिसरातील रहिवाशी आक्रमक झाले.याच वेळी कार्तिकी यात्रेस आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुयोग्य पुनर्वसनाचा शब्दही दिला परंतु विरोध मावळू शकला नाही.तर या प्रस्तावित कॅरिडॉर व रस्ते रूंदीकरणाबाबत माजी आमदार प्रशांत परिचारक यांची भूमिका काय असाही प्रश्न येथील जनतेला पडला होता.

    आता परिचारक यांच्याकडून देण्यात आलेल्या माहिती नुसार त्यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना याबाबत एक पत्र लिहले असून यात उपरोक्त बाबीचा उहापोह केला आहे.
  पहा काय आहे या पत्रात   

प्रति,

मा.जिल्हाधिकारीसोा,

जिल्हाधिकारी कार्यालय,

सोलापूर.

 

विषय : पंढरपूर तिर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत…

 महोदय,

उपरोक्त विषयास अनुसरून, शासन नियमानुसार प्रत्येक शहराचा दर 20 वर्षानंतर विकास आराखडा तयार करणेत येतो. त्याचप्रमाणे पंढरपूर शहराचा सन 2011-2012 साली पुढील 20 वर्षाचा विचार करून विकास आराखडा तयार करणेत आला होता. परंतु मा.मुख्यमंत्री महोदयांनी तिर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्याच्या सुचना केल्या. सोलापूर जिल्ह्यातील काही अधिकारी यांनी भारतातील वाराणसी सारख्या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी भेट देऊन तेथील धर्तीवर पंढरपूर शहराचा तिर्थक्षेत्र विकास आराखडा त्यांचे स्तरावर तयार केला. याबाबत स्थानिक नागरीक, व्यापारी तसेच लोकप्रतिनिधी यांना विश्‍वासात न घेता सदर आराखडा तयार करणेत आला आहे. त्या आराखड्यामध्ये मंदिर परिसर 120 मीटर रूंद करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

वास्तविक, वाराणसी येथील भौगोलिक परिस्थिती व पंढरपूर येथील भौगोलिक परिस्थती यात खूप मोठ्या प्रमाणात तफावत आहे. वाराणसी येथील रस्ते खूपच अरूंद होते. त्याप्रमाणात पंढरपूर येथील मंदिर परिसरातील रस्ते मोठे आहेत. यापुर्वी पंढरपूर येथील अरूंद रस्त्यांमुळे 1982-1983 साली मंदिर परिसरात मास्टर प्लॅन करणेत आला होता. त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणावर नागरीकांना बेघर करण्यात आले होते. त्यांना आजही न्याय मिळालेला नाही.

वाराणसी येथे मंदिरालगत शासनाची कसल्याही प्रकारची जागा उपलब्ध नव्हती. परंतु पंढरपूर मंदिर परिसरात शासनाच्या अनेक जागा आहेत. मंदिर परिसरातील नागरिकांचे साधारण 500 ते 700 वर्षापासून तेथे वास्तव्य आहे. सन 1982-83 साली विस्थापीत झालेल्या लोकांनाच पुन्हा बेघर-विस्थापीत करणे हिताचे होणार नाही. वाराणसी येथे कोठेही वाळवंट नाही. पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात चंद्रभागा नदीपात्रात वाळवंट उपलब्ध आहे. पंढरपूर येथील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे, येथे 120 मीटर रूंदीच्या कॉरिडॉरची गरज आहे असे वाटत नाही. 

पंढरपूर येथे पदस्पर्श दर्शन असलेने यात्रा काळात 24 तास दर्शन असताना साधारणपणे 40 ते 45 हजार पेक्षा जास्त भाविक दर्शन घेवू शकत नाहीत. साधारण एका तासात 2000 पेक्षा कमी भाविक दर्शन घेवून बाहेर पडतात. सध्या मंदिर परिसरातील रस्त्यांची रूंदी पाहता त्या ठिकाणी तासाला 25,000 पेक्षा जास्त लोक सदर रस्त्यावरून फिरू शकतील. तसेच मंदिर परिसरातून साधारण 2 ते 3 किमी अंतरावर असणाऱ्या अधिकृत व अनाधिकृत 1000 ते 1500 मठामध्ये वारकऱ्यांचे वास्तव्य असते. अतिशय अल्पसंखेने वारकरी मंदिर परिसरात वास्तव्यास असतात. आपले दैनंदिन भजन, किर्तन प्रवचन यासाठी वारकरी त्या त्या भागातील मठ, धर्मशाळा, वाळवंट तसेच चंद्रभागा नदीपलीकडील 65 एकर जागा या ठिकाणी दिवसभर राहतात.

या सर्व बाबींचा विचार करता मंदिराभोवती 120 मीटरचा पादचारी रस्ता कॉरिडॉर आराखडा कोणताही शास्त्रीय अभ्यास न करता बनवला आहे, असे माझे मत आहे. त्यास  कोणत्याही  नगररचना विभागाचा आधार नाही. सदरचा कॉरिडॉर 120 मीटरचाच का? तो 30/50 मीटरचा का नाही? याचा उलगडा होत नाही. 120 मीटर रूंदीचा कॉरिडॉर भविष्यात कमी पडल्यास पुन्हा नवीन कॉरिडॉर बनणार का? या खुलासा होत नाही. सबब वरील 120 मीटरचा मार्ग (कॉरिडॉर) बनविण्याची गरज आहे असे वाटत नाही. त्याऐवजी पंढरपूर शहाराच्या आठही दिशांना रूंदीकरण करून विकेंद्रीकरण केले तर ते भविष्याच्या दृष्टीने व लोकांच्या दृष्टीने योग्य होईल.

     आपण पंढरपूर तिर्थक्षेत्राचा विकास करीत आहात, त्याबाबत दुमत नाही. आज पंढरपूरमध्ये येणाऱ्या यात्रेकरूंना त्रास होतो त्याची कारणे पुढील प्रमाणे :-

  1. चंद्रभागा वाळवंटामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुखसोई वारकऱ्यांना नाहीत.नदीपात्रात 12 महिने स्वच्छ पाणी राहत नाही. वाळू चोरी मोठ्या प्रमाणावर होवून मोठे खड्डे वाळवंटात पडले आहेत, यामध्ये अपघात होवून अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत. 
  2. येणाऱ्या यात्रेकरूंच्या अंदाजे4 ते 5 हजार गाड्या उभ्या करणेस मंदिर परिसरात पार्कींग व्यवस्था नाही.
  3. मंदिरात दर्शनाकरिता बालाजी प्रमाणे वेळ ठरवून दिली जात नाही.
  4. मंदिराजवळ1/2 ते 1 किमी च्या आत चारी बाजूंना दर्शन मंडप नाहीत. त्यामुळे यात्रेकरूंना 5 ते 6 किमी लांब जावे लागते.
  5. एमएसईबीने चूकीच्या पध्दतीने रस्त्यात उभे केलेले लाईटचे खांब,ट्रान्सफॉर्मर आणि कनेक्शनच्या लाल पेट्या यामुळे उपलब्ध रस्ता दोन्ही बाजूने 5-5 फुटाने अरूंद झालेला आहे.
  6. व्हिआयपी दर्शनाचा त्रास वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर भोगावा लागतो.

वरील बाबींमुळे यात्रेकरूंची असुविधा निर्माण होते. वरील समस्यांवरील उपाय करता येतील ते पुढीलप्रमाणे :-

1) पंढरपूर शहरात 500 मीटर ते 1 किमी पर्यंत उपलब्ध नगरपालिकेच्या किंवा सरकारच्या जागांवरती खाली शॉपींग सेंटर व वरील बाजूस 5 ते 6 मजली पार्कींग हे उभा केल्यास मंदिर परिसरातील टपरी धारकांना त्या ठिकाणी व्यवसायास जागा व वाहन तळावरती वाहने उभी करणेस जागा उपलब्ध होईल.

2) शहरातील अनधिकृत झोपडपट्या यांचे योग्य पध्दतीने मल्टी स्टोअर बिल्डींग बांधून पुर्नवसन केल्यास त्या जागांवर चारही दिशांना दर्शन मंडप बांधून 8 दिशांमधून येणाऱ्या यात्रेकरूंची मंदिराकडे येणेबाबतचे नियोजन करता येईल. त्याकरिता एसआरए सारखी योजना लागू करावी.

3) चंद्रभागा नदीच्या काठावरती दोन घाटांमध्ये असणारी जागा ही नगरपालिका हद्दीतील आहे. तो नो डेव्हलपमेंट झोन नाही. त्या ठिकाणी खाली शौचालय काही दूकाने पिण्याचे पाणी व वरती मल्टीस्टोअर पार्कींग उभा करावे. त्याला येणेजाणेसाठी नदीघाट कडेने रस्ता व उड्डाणपूल बांधवा.

4) शहरामध्ये होणारे, मंदिर परिसरातील प्रदक्षिणा मार्गावरील होणारे अतिक्रमण व बेकायदेशीर बांधकामे काढणेसाठी स्वतंत्र वेगळी यंत्रणा निर्माण करणे.

5) ट्रॅफिक पोलीसांची यंत्रणेमार्फत ट्रॅफिकशिस्त लावणेकरिता निर्माण करावी.

6) चंद्रभागेच्या पात्रामध्ये शुध्द पाणी राहणेसाठी कायमस्वरूपी नियोजन करणे गरजेचे आहे. वाळू चोरीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

7) व्हीआयपी दर्शनासाठी मंदिर परिसरापासून 500 मीटर अंतरावरून अंडरग्राऊंड किंवा ओव्हर ब्रीज करून वेगळी व्यवस्था करणेत यावी. म्हणजे व्हिआयपी लोकांची वाहने मंदिर परिसरात येणार नाहीत.

8) मंदिरामध्ये मुखदर्शनाची 12 महिने स्वंतत्र व्यवस्था करावी. जेणेकरून ज्यांना मुखदर्शन घेवून लगेच जायचे आहे ते जाऊ शकतील.

9) प्रदक्षिणामार्गावरती एखादा इलीव्हेटेड (स्कायवॉक) बांधल्यास दुप्पट लोक आहे त्या व्यवस्थेत प्रदक्षिणा घालू शकतील.

वरील अडचणी व उपायांचा विचार करून येथील स्थानिक लोक आहेत, यांच्याशी चर्चा करून पंढरपूरचा विकास आराखडा बनवावा. मंदिर परिसरातील लोकांना त्यांचे त्यांचे उद्योग व्यवसाय चालणेसाठी मंदिर परिसरातील जागा असणे गरजेचे आहे. त्यांची जवळपास 500 ते 700 वर्षापासून घरेदारे आहेत. त्या मिळकती पाडून त्यांना गावाबाहेर घालविणे म्हणजे ज्या लोकांनी आत्तापर्यंत श्री पांडुरंगाची सेवा केली व परंपरा सांभाळल्या जतन केल्या त्यांच्यावरती अन्याय करणे सारखे आहे.

वरील बाबींचा विचार करून आपण हा आराखडा बनवल्यास त्यास नागरिकांचा कोणताही विरोध असणार नाही.

आपण नुकत्याच झालेल्या कार्तिक वारीच्या वेळी सदर आराखडा मा.उपमुख्यमंत्री महोदयांना दाखविला. सदर बैठकीमध्ये स्थानिक लोकांना विस्थापीत करणे, त्यांची घरे पाडणे. या गोष्टींसाठी मी स्वत: एकट्याने विरोध दर्शविला होता. तसेच स्थानिक नागरिकांची पिढ्यानपिढा वास्तव्यास असलेली घरे राहिली पाहिजेत, व्यापार टिकला पाहिजे अशी मी भुमिका घेतली होती. त्यावेळेस मा.उपमुख्यमंत्री महोदयांनी माझ्या म्हणण्याला दुजोरा देवून एकाही व्यक्तीस त्याच्या उद्योग धंद्यापासून वंचित ठेवले जाणार नाही, विस्थापीत केले जाणार नाही. त्यास योग्य ती सोय करूनच हा आराखडा पंढरपूर शहरातील जनतेच्या मनाप्रमाणे करू असे मला अश्‍वस्त केले, याचे आपण स्वत: साक्षीदार आहात. त्यामुळे मेहेरबान आपण योग्य त्या गोष्टींचा विचार करून पुढील निर्णय करावे हि विनंती.

काही दिवसांपुर्वी मा.सचिवांची बैठक झाली त्या बैठकीचे दुदैवाने मला निमंत्रण नसलेने तेथे भूमिका मांडता आली नाही. मी माझी भूमिका मा.ना.उपमुख्यमंत्री महोदय यांचे बैठकीत मांडली आहे. या पत्राचा विचार करून स्थानिक लोकांना योग्य वाटेल असा आराखडा बनवाल याची मला खात्री आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *