ताज्याघडामोडी

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; अखेर देशभरातून मान्सूनचा निरोप, हवामान विभागाची माहिती

तब्बल १४८ दिवसांच्या उपस्थितीनंतर आणि दिवाळीपर्यंत रेंगाळलेल्या मान्सूनने रविवारी, २३ ऑक्टोबरला संपूर्ण देशाचा निरोप घेतला. मुंबईसह राज्याच्या अनेक भागांमधूनही रविवारीच मान्सून माघारी फिरल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले. पश्चिमेकडील मान्सूनच्या परतीची रेषा डहाणूपर्यंत येऊन थांबली होती. वातावरणातील आर्द्रता कमी झाल्यानंतर रविवारी संपूर्ण देशातून मान्सून माघारी फिरल्याचे स्पष्ट करण्यात आले. २९ मे रोजी केरळचा बहुतांश भाग व्यापत मान्सून देशात दाखल झाला होता. 

गेल्या आठवडाभर परतीच्या पावसाने मध्य महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणल्याने आता त्याने निरोप घ्यावा, अशी प्रार्थना सुरू होती. पावसाळा संपल्यानंतर परतीच्या पावसाने प्रवास सुरू केला. २० सप्टेंबरला मान्सून भारतातून माघारी फिरल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र त्यानंतर २९ सप्टेंबरपर्यंत पावसाची परतीची रेषा स्थिर होती. महाराष्ट्राच्या वेशीपर्यंत आलेला परतीचा पाऊस वातावरणीय स्थितीमुळे बहुतांश भागात खोळंबला होता आणि तब्बल एक महिन्याहून अधिक काळानंतर रविवारी, २३ ऑक्टोबरला मुंबई, कोकण विभाग, पुणे, मध्य महाराष्ट्र यांच्यासह उर्वरित भागातून पाऊस माघारी फिरला. गेल्यावर्षीही १४ ऑक्टोबरपासून तर त्याच्या आदल्या वर्षी २६ ऑक्टोबरपासून राज्यातून पावसाने माघार घेण्यास सुरुवात केली होती. संपूर्ण देशातून गेल्यावर्षी २५ ऑक्टोबरला नैऋत्य मौसमी पाऊस परत फिरला होता.

यंदा मान्सून पूर्ण माघारी फिरायच्या आधी १ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर या कालावधीत देशभरात सरासरीपेक्षा ६५टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. एकूण १०४.२ मिलीमीटर सरासरी पाऊस या काळात पडला. सर्वसाधारपणे या कालावधीत ६३.२ मिलीमीटर पाऊस पडतो. ११ राज्यांमध्ये तीव्र अतिरिक्त, १२ राज्यांमध्ये अतिरिक्त, १० राज्यांमध्ये सरासरीइतका तर तीन राज्यांमध्ये सरासरीहून कमी पाऊस पडल्याची या कालावधीत नोंद झाली. दिल्लीमध्ये ४६९ टक्के, उत्तर प्रदेशात ४२५ टक्के, उत्तराखंडमध्ये ३०४ टक्के, राजस्थानमध्ये २०८ टक्के, मध्य प्रदेशात २१८ टक्के सरासरीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातही सरासरीच्या १०२ टक्के पाऊस ऑक्टोबर महिन्यामध्ये अधिक पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *