गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

हुंड्यासाठी मानसिक छळ; विवाहितेनं संपवलं जीवन

हुंड्यासाठी शारीरिक मानसिक छळ व सासरच्या जाचाला कंटाळून एका २२ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथे ३० सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीसह ५ जणांना अटक केली आहे.

राधिका पवन खेत्री (वय २२) असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. राधिकाला अवघी ८ महिन्यांची चिमुकली असून या घटनेने समाजमन अगदी सुन्न झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, दीड वर्षापूर्वी मृत राधिकाचा विवाह देऊळगाव माळी येथील पवन विश्वनाथ खेत्रे या युवकासोबत झाला होता.

विवाह झाल्यापासून पती व सासारकडील मंडळी राधिकाला सतत माहेरवरून पैसे आण अशी मागणी करीत होते. दरम्यान ८ महिन्यापूर्वी गौरी नावाची मुलगी झाली होती. मुलीला होणारा त्रास बघून राधिकाच्या माहेरकडील मंडळींनी सासरकडील मंडळी सोबत दोनवेळेस बैठका घेऊन काही पैसे दिले होते.

मात्र, तरी सुद्धा सासरकडील मंडळी राधिकाचा छळ करीत होते. यामध्ये राधिकाच्या पतीचा देखील समावेश होता. सतत मानसिक छळ होत असल्याने अखेर कंटाळून राधिकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मन मिळाऊ सुस्वभावी स्वभावाच्या राधिकाने अचानक टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, राधिकाच्या माहेरच्या मंडळींनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी राधिकाच्या पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल केलाय. या पाचही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *