गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तर अंगावर वर्दी ठेवणार नाही, पोलिसांना धमकी देत शिवीगाळ, धक्कादायक प्रकार

औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात राहावी म्हणून अनेक संपूर्ण राज्यात प्रतिबंधात्मक नियम लागू आहेत. मात्र, अनेक ठिकाणी नागरिकांकडून नियम पायदळी तुडवले जातायत. एवढेच नाही तर नियम मोडल्यामुळे जाब विचारल्यानंतर अनेकजण पोलिसांशी हुज्जतसुद्धा घालत आहेत. त्याची प्रचिती औरंगाबादेत आली आहे. मास्क न घातल्यामुळे पोलिसांनी अडवल्यामुळे त्यांच्याशी धक्काबुक्की करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन तरुण आणि दोन महिलांविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

नेमका प्रकार काय ?

राज्य सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले, तरी अजूनही अनेक नियम लागू आहेत. मात्र यादरम्यान औरंगाबादेत काही तरुण चेहऱ्याला मास्क न लावता फिरत होते. विनामास्क फिरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर विचारपूस करण्यासाठी पोलिसांनी त्यांना अडवले. मात्र, यावेळी दोन महिला आणि जमावाने पोलिसांना धक्काबुक्की केली. तसेच यावेळी दोन महिलांसोबत इतर जमावाने पोलिसांना शिवीगाळसुद्धा केली. हद्द म्हणजे या जमावाने पोलिसांच्या अंगावर धावून जात त्यांना मारण्याची धमकीसुद्धा दिली.

…तर अंगावर वर्दी ठेवणार

मास्क न लावल्यामुळे पोलिसांनी अडवल्यानंतर काही तरुण तसेच महिलांनी पोलिसांना थेट धक्काबुक्की केली. तसेच यावेळी या जमावाने पोलिसांना बॅरिकेट्स काढा अन्यथा अंगावर वर्दी ठेवणार नाही, अशी धमकीसुद्धा दिली. यावेळी पोलिसांवर केलेल्या हल्ल्यादरम्यान जमावातील व्यक्तीने एका पोलिसाच्या वर्दीवरील नेमप्लेटसुद्धा काढून घेतली.

दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर त्याची गंभीर दखल औरंगाबाद पोलिसांनी घेतली. पोलिसांनी या प्रकरणी दोन तरुण तसेच दोन महिलांविरोधात शहराच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *