ताज्याघडामोडी

या आहेत नव्या विकास आराखड्यावरील 34 महत्वपूर्ण हरकती व सूचना

वारकरी संप्रदाय पाईक संघाने दाखल केल्या ३४ सूचना व हरकती 

 

१)उद्धव घाट ते विप्रदत्त घाट असा पाठीमागील बाजुने ‘पाईक सेतू ‘ हा खास दिंड्यांसाठी प्रदक्षणा पुल तयार करुन तांबडा मारुती ते कालिका देवी चौक या रोडवरील सर्व दिंड्या रथ या पुलावरुन नेल्यास एकादशी दिवशीहोणारी महाद्वार घाट व चौक परिसरातील ५०% गर्दी कमी होईल
२) दगडी पुल ते रेल्वे पुल (अंबाबाई पटांगण व काॅटेज हास्पिटल /मागिल नदीपात्र ,मांडव खडकी परिसर)या ठिकाणी अलिकडे व पलिकडे दोन्ही बाजूला दगडी घाटांची निर्मिती करावी जेणेकरुन दगडी पुलाच्या अलिकडील गर्दी कमी होईल.
३) विकास आराखड्यातील जुना दर्शन मंडप पाडून नवा बांधण्याच्या ऐवजी त्याच दर्शन मंडपात अंतर्गत बांधकामाचे बदल करून मोकळे हॉल निर्माण केल्यास चांगले होईल. तसेच सदर मोकळ्या हॉलमध्ये भाविकांना तिरुपती बालाजी धरतीवर प्रतीक्षालय निर्माण करून, दर्शनासाठी लवकरात लवकर टाईम टोकन व्यवस्था सुरू केल्यास नवीन दर्शन मंडपाची सुद्धा तसेच गोपाळपूर रोडला दर्शन बारी नेण्याची आवश्यकता भासणार नाही यासंदर्भात तपशील मांडण्यासाठी आम्हाला स्वतंत्र वेळ मिळावा. जर जुन्या दर्शन मंडपात अंतर्गत बदल करणे शक्य नसल्यास तीन मजली नवा दर्शन मंडप याच ठिकाणी उभा राहावा व गोपाळपूर रोडला बांधण्यात येणारा दर्शन मंडप रद्द करावा तसेच जुन्या दर्शन मंडपा खाली असणाऱ्या स्थानिक व्यापारी बांधवांना विस्थापित न करता त्यांची योग्य ती व्यवस्था करावी.
४) श्री विठ्ठल मंदिराचा सभामंडप हा ऐतिहासिक असून त्याचे जतन व संवर्धन व्हावे व हा सभामंडप केवळ भजन कीर्तन नामस्मरण यासाठीच आरक्षित असावा.
५) भाविकांना दर्शनासाठी गेल्यानंतर त्याठिकाणी पादत्राणे सोडून पुन्हा बाहेर पडणाऱ्या ठिकाणी मिळण्याची व्यवस्था असावी. तसेच मंदिरातील मोबाईल बंदी उठवून शाॅपिंग माॅल मध्ये आपल्या जवळील पिशवीस लाॅक करण्याची जी पद्धती वापरली जाते तीच वापरत भाविकांकडेच मोबाईल ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी.
६)टाईम टोकन दर्शन व्यवस्था सुरू केल्याने मुखदर्शनाची गर्दी कमी होणार आहे त्यामुळे मंदिराशेजारील दक्षिणेकडील तरटी दरवाजासमोरील रिकाम्या जागेत मुखदर्शन बारी बसवता येते का याची तपासणी करावी.तसेच श्रद्धास्थान असणाऱ्या कान्होपात्रा (तरटी) वृक्षाचे संवर्धन व्हावे.
७) सहकार चौक व इंदिरा गांधी मार्केट येथील वाहनतळ हे स्थानिक नागरिकांसाठी आरक्षित असावे जेणेकरून स्थानिक नागरिकांची वाहने रस्त्यावर लागणार नाहीत.त इतर वाहनतळावर सुद्धा १० ते २०% स्थानिक नागरिकांसाठी आरक्षण असावे.
८) महाद्वार चौक येथील प्रस्तावित वाहनतळ व शॉपिंग सेंटर च्या ऐवजी तिरुपतीच्या धर्तीवर मोठा शॉपिंग मॉल उभारण्यात यावा जेणेकरुन परिसरात हाॅकर्सचे प्रमाण कमी होईल. इथे मोठे वाहन तळ नसावे, कारण मंदिराच्या इतक्याजवळ वाहन पार्क करणे हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य नाही.
९) वि.आ.पा.क्र ४३ वरील अंबाबाई पटांगण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळांचे मैदानच असले पाहिजे या ठिकाणी कोणताही वाहन तळाचा प्रस्ताव मंजूर करू नये दगडी पुलाचे डावे व उजवे बाजूस दररोज येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करता येऊ शकते जेणेकरून भाविक त्या ठिकाणी गाडी लावून चंद्रभागेचे स्नान करून महाद्वार घाटावरून मंदिराकडे जातील.
१०)वि.आ.पा.क्र ४५ वरील नवी पेठ येथे भाजी मंडई व बहुमजली वाहनतळ तयार करणे यामध्ये पूर्वीपासून येथे असलेले कुस्तीचा आखाडा सुद्धा १००० प्रेक्षक क्षमतेसह नवीन विकास आराखड्यात समाविष्ट असावा. या ठिकाणी असणारा श्रीकृष्ण हौद याचेही सुशोभीकरण व्हावे.
११)वि.आ.पा.क्र ६९ भजन दास चौक ते अंबाबाई पटांगण रस्ता हा होणे अत्यंत गरजेचे आहे. हे काम प्राधान्याने करणे आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी बाधित होणाऱ्या मालमत्तांना सरसकट चांगला मोबदला देणे आवश्यक आहे.
१२) आवश्यक भूसंपादन करताना कोणतीही ऐतिहासिक वास्तू बाधीत होणार नाही असे नियोजन करावे.
१३) वि.आ.पा.क्र ८९ एकवीरा देवी ते कासार घाट रस्ता या ठिकाणाहून जाणारा दर्शन बारी मार्ग हा पुढे चंद्रभागा घाटाकडे रस्त्यावरून फिरवणे ऐवजी तो तसाच सरळ पुढे चंद्रभागेतून पाईक सेतुला जोडूनच पुढे न्यावा जेणेकरून हा मार्ग चंद्रभागा घाटापर्यंत भाविकांना मोकळा वापरता येईल.तसेच हा रस्ता १२ मीटर ऐवजी ८ मीटर करावा.
१४)वि.आ.पा.क्र ९३ कालिका देवीचे विप्रदत्त घाट या रस्त्यावर उद्धव घाटाकडून येणाऱ्या पाईक सेतू ला जोडणारा व रोहीदास चौकात समाप्त होणारा रॅम्प ब्रिज बनवावा.
१५))वि.आ.पा.क्र १०५ जुनी नगरपालिका घाट या घाटात संत कबीर महाराज घाट असे नाव द्यावे व या घाटात संपूर्ण नवीन दगडी पायऱ्या बसवण्यात याव्या.
१६ )वि.आ.पा.क्र ११५ पंढरपूर शहरातील पाणीपुरवठा हा २४ तास असावा जेणेकरून पाण्याचा अपव्यय टाळता येईल . तसेच प्रदक्षिणा मार्गावर दर दोनशे फुटावर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था निर्माण करावी.
१७) वि.आ.पा.क्र ११५ भुयारी गटार कामे व्यवस्थित करून चंद्रभागेत मिसळणारे मैला, घाण पाणी तात्काळ बंद करावे.
१८) पंढरपुरात येणार्या भाविक भक्तांना मद्य व मांस विक्रीच्या दुकानांमुळे त्रास सोसावा लागतो त्यांना अध्यात्मिक नगरीचा अनुभव येण्याऐवजी त्यांच्या भावना दुखावतात . त्यासाठी पंढरपूर शहराच्या बाहेर सदर विक्रेत्यांसाठी मोठे विक्री स्थळ निर्माण करावे व पंढरपूर शहरात मध्य व मांस विक्रीवर बंदी घालावी.
१९)वि.आ.पा.क्र ११९ नवीन मोठमोठी शौचालय निर्माण करणे ऐवजी पंढरपूर शहरात ज्या ज्या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने उतरतात त्या ठिकाणी अतिरिक्त शौचालयांची निर्मिती शासनाने स्वखर्चाने करून द्यावी तसेच प्रदक्षिणा मार्गावर पाच ते दहा सीट्स क्षमतेची लहान शौचालय तसेच मूत्रविसर्जन व्यवस्था निर्माण करावी.
२०)वि.आ.पा.क्र १५५ पंढरपूर शहरात प्रत्येक रस्त्यावर महावितरणचे अंडरग्राउंड लाइटिंग चे मोठे मोठे लाल रंगाचे बॉक्स उभे आहेत हे सर्व बॉक्स अतिक्रमण पद्धतीने बसवलेले दिसून येते.त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो याची योग्य ती व्यवस्था करावी
२१)वि.आ.पा.क्र १६५ पालखीतळांचे भूसंपादन व विकास कामे यासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्री संत तुकाराम महाराज संस्थान यासह येणाऱ्या सर्व पालख्यांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्या आवश्यक सूचनांशिवाय आराखडा पूर्ण करू नये.
२२)वि.आ.पा.क्र १९३ शेगांव दुमाला ६५ एकर शेजारील क्षेत्राचे रेल्वेची जमीन सोडून इतर नवीन भूसंपादनाचे प्रस्ताव तेथील रहिवाशांवर अन्याय करणारे आहेत. तरी ६५ एकर चा परिसर विस्तारित करण्याऐवजी पंढरपूरच्या चारी दिशेला ६५ एकर प्रमाणे तळ विकसित करण्यात यावेत.
२३)वि.आ.पा.क्र २०१ संत नामदेव महाराज स्मारकासाठी संत नामदेव महाराज पायरी समाधी तसेच नामदेव महाराजांचे जन्मस्थळ नामदेव मंदिर यांच्या विकास कामांना अधिक प्राधान्य द्यावे माजी राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांनी नामदेव महाराजांचे जन्मस्थळ विकसित केले पाहिजे अशी भूमिका मांडली होती.
२४ )वि.आ.पा.क्र २०८ गोपाळपूर येथील गोपाळ कृष्ण मंदिर व मंदिर परिसराची सुधारणा करताना त्याचे प्राचीनत्व व ऐतिहासिक ढाचा कायम ठेवत सुधारणा कराव्या.
२५) संत तुकाराम महाराज संतपीठ ही संस्था मंदिर समितीच्या अंतर्गत न बनवता थेट शासनाने हे स्वतंत्र विद्यापीठ मंजूर करावे व महाराष्ट्रातील सर्व वारकरी शिक्षण संस्था याच्याशी संलग्न कराव्या.
२६) मंगळवेढा येथील संत चोखोबारायांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण व्हावे.
२७) श्रीक्षेत्र अरण येथे सावता महाराज, कुर्मदास महाराज, श्रीक्षेत्र मंगळवेढा येथील संत दामाजी महाराज,संत चोखामेळा महाराज , देगाव येथील ऐतिहासिक विहीर व पंचक्रोशीतील प्रसिद्ध ठिकाणे पाहण्यासाठी व परिसरातील पर्यटन वाढण्यासाठी एसटी महामंडळामार्फत क्षेत्र दर्शन बस सेवा सुरु करावी. तसेच आळंदी देहू त्र्यंबकेश्वर मुक्ताईनगर पैठण ही वारकरी क्षेत्र थेट बसेसने जोडण्याची व्यवस्था करावी.
२८))वि.आ.पा.क्र २२४ मंदिर समिती कायदा निर्माण करून सुद्धा भाविकांना कोणत्याही विशेष सुविधा मिळालेल्या नाहीत उलट अनेक प्रशासकीय निर्णयांचा भाविकांना फटका बसलेला आहे त्यामुळे मंदिर कायद्यामध्ये दुरुस्ती करणे ऐवजी सदर मंदिर अधिनियम कायदा रद्द करून मंदिर पुन्हा श्री विठ्ठल भक्तांच्या ताब्यांमध्ये देण्याची व्यवस्था शासनाने करावी.२९)वि.आ.पा.क्र ९१ प्रदक्षिणा मार्ग ते चंद्रभागा घाट येथील चंद्रभागा मंदिर जिर्णोद्धार काम चालू आहे यास कोणतीही बाधा नसावी येथील बाजुचे भुयारी गटार चेंबर दुसऱ्या ठिकाणी हलवावे.
३०)विकास आराखडा तयार करताना तसेच अंतिम स्वरूप देताना जिथे पूर्वी भूसंपादन झाले आहे तिथे अनावश्यक रित्या भूसंपादनाचा घाट घालू नये. विकास आराखड्याच्या नावाखाली पंढरी क्षेत्र भकास करण्याचे प्रयत्न टाळावे.
३१) हा विकास आराखडा पंढरपूर येथे तुकाराम भवन मध्ये आठ दिवस स्थानिक नागरिकांना समजावून सांगावा तसेच त्यांच्या काही योग्य सूचना व हरकती हरकती मागवाव्या यासाठी किमान ४५ दिवसांची मुदत देणे आवश्यक.
३२) सध्य विकास आराखडा व्यतिरिक्त ऐनवेळी कोणताही भूसंपादन प्रस्ताव विकासाच्या नावाखाली जोडू नये. विशेषतः वाराणसी धर्तीवर पंढरपुर मंदिर परिसरात काॅरीडाॅर निर्माणाचा कोणताही प्रस्ताव आणू नये.कारण इथे यापुर्वीच भुसंपादन रस्तारुंदीकरण झालेले आहे. त्यातील बाधीतांचे प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत.तरी प्रशासनाने ऐनवेळी अतिरिक्त पणे कोणताही छुपा कार्यक्रम राबवू नये.यास वारकरी संप्रदायाचा तीव्र विरोध असेल.
३३)विकास आराखड्याचा उद्देश हा वाढती लोकसंख्या व वाढती यात्रेकरूंची संख्या या दृष्टीने सुटसुटीत नगररचना करणे असले तरी पंढरीचे आध्यात्मिक रुपडे कायम ठेवत ही रचना करण्यास प्राधान्य असावे.
३४) वारकरी संप्रदायासाठी करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमुळे आपल्या घरादारांवर गंडांतर येत आहे अशी भावना येथील नागरिकांमध्ये निर्माण होत आहे तरी प्रशासनाने समन्वयाने कोणतेही प्रस्ताव जनतेसमोर मांडावेत वारकरी संप्रदायाच्या नावावर अनावश्यक प्रस्ताव टाळावे.
वरील सुचनांचे तसेच अधिक सुचनांचे सुस्पष्ट सादरीकरण करण्यासाठी मा.प्रशासकिय अधिकाऱ्यांनी वारकरी संप्रदायास स्वतंत्र बैठकीची वेळ द्यावी जेणेकरून पंढरीच्या विकासाचे आदर्श नियोजन आपणास करता येईल.तरी लवकरात लवकर सदर बैठकीचे आयोजन करावे ही नम्र विनंती.

आपले नम्र,
ह‌.भ.प.श्री. विठ्ठल महाराज चवरे
राष्ट्रीय अध्यक्ष
वारकरी संप्रदाय पाईक संघ

ह.भ.प.श्री‌.रामकृष्ण हनुमंत महाराज वीर
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष
वारकरी संप्रदाय पाईक संघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *