ताज्याघडामोडी

मुलांचे आरोग्य आणि शिक्षण यावर भर देऊन आरोग्यदायी,संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम पिढी घडवा

जि.प.सीईओ दिलीप स्वामी यांचे आवाहन

जिल्हा परिषदेचा मुलांसाठीचा दशसूत्री कार्यक्रम जाहीर

जिल्हा परिषदेने मुलांसाठीचा दशसूत्री कार्यक्रम जाहीर केला आहे. मुलांना बाल वयातच चांगल्या सवयी लागतात. काय खावे..काय खाऊ नये…यावर कटाक्षाने भर दिले तर मुलांचे आरोग्य सुधारेल. मुलांचे आरोग्य आणि शिक्षण यावर भर देऊन आरोग्यदायी, संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
सिव्हील हॉस्पिटलमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) आढावा बैठकीत श्री. स्वामी बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, कार्यक्रम समन्वयक भगवान भुसारी उपस्थित होते.
…तर ग्रामीण भागाचा स्वर्ग होईल…
श्री. स्वामी यांनी सांगितले की, दशसूत्री मुलांच्या भवितव्यासाठी आवश्यक आहे. 10 हजार शिक्षकांना दशसूत्री कार्यक्रम समजावून देत आहे. सध्या जंकफूडमुळे मुलांचे आरोग्य बिघडत आहे. यामुळे पालकांचाही दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न आहे. स्वच्छता, हात धुणे अशा चांगल्या सवयी लागण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. जिल्हा आरोग्य आणि शिक्षण सुधारले तर ग्रामीण भागाचा स्वर्ग होण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्यची टीम चांगले काम करीत आहे. माझे मूल माझी जबाबदारी आणि माझ गाव कोरोनामुक्त गाव या अभियानामध्ये सर्व अडचणीवर मात करून या टीमने उत्कृष्ट काम केल्याने जिल्हा परिषदेचा राज्यात सन्मान झाला आहे. अशीच कामगिरी आपल्याकडून अपेक्षित आहे. प्रत्येक शाळेत आपल्या टीमचा एक डॉक्टर जाऊन आरोग्याविषयी माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
सध्या मुलांना माहिती तंत्रज्ञानाची खूप आवड असल्याने त्यांना त्याविषयी माहिती द्यावी. स्पर्धाक्षम विद्यार्थी होण्यासाठी प्रयत्न करण्याविषयी शिक्षकांना संदेश दिला आहे. त्यांना आई,वडिल, वडिलधारे, गुरू यांचे महत्व पटवून द्यायला हवे. जिल्हा परिषद, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य, खाजगी संस्थांद्वारे मुलांचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन श्री. स्वामी यांनी केले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य टीमने गतीने आणि गुणवत्तापूर्ण काम करावे.
श्री. स्वामी यांनी अंगणवाडी, शाळा येथील मुलांची आरोग्य तपासणी, नेत्र तपाणी, हृदयरोग शस्त्रक्रिया, गंभीर आजारावरील शस्त्रक्रिया याबाबत टीमचे कौतुक केले.
डॉ. कुलकर्णी आणि डॉ. ढेले यांनी जिल्ह्यातील आरबीएसकेच्या कामाबाबतची माहिती दिली. आतापर्यंत चला मुलांनो उजेडाकडे मोहिमेतून मुलांच्या नेत्रांची तपासणी केली असता 1670 मुलांना दृष्टीदोष असल्याचे आढळून आले आहे. 75 मुलांना डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी संदर्भित केले आहे. आतापर्यंत 1266 मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया तर 3341 मुलांच्या इतर शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी एचआयव्ही संसर्गित, वारांगना, तृतीयपंथी, अनाथ यांना कोरोनाचे सर्वात जास्त लसीकरण केल्याने प्रधानमंत्र्यांचे अभिनंदन पत्र मिळालेल्या आरोग्यसेविका अर्चना पकाले यांचा श्री. स्वामी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *