ताज्याघडामोडी

पोलीस स्टेशनमध्येच ओढणीने गळफास, महिला पोलिसाचं धक्कादायक पाऊल

ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात ऑन ड्युटी महिला पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मंगळवारी दुपारी श्रीनगर पोलीस ठाण्यात ही घटना घडली. घरगुती वादातून या महिला पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात रुजू असलेल्या अनिता भीमराव व्हावळ या ३४ वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस स्टेशनमध्ये ऑन ड्युटी आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. अनिता व्हावळ या २००८ च्या बॅचच्या महिला पोलीस कर्मचारी होत्या. त्या ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये महिला पोलीस नाईक पदावर कार्यरत होत्या.

मंगळवारी १६ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास पोलीस स्थानकात या महिला पोलीस कर्मचारी अनिताने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अनिता यांना त्यांच्या पश्चात दोन मुली असून त्यापैकी एक दहावीला तर दुसरी सहावीला आहे. त्यांचा पती एका प्रायव्हेट कंपनीत कामाला आहे. या घटनेबाबत श्रीनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

मंगळवारी १६ ऑगस्ट रोजी महिला पोलीस नाईक अनिता व्हावळ या नेहमीप्रमाणे सकाळी साडे १० वाजता श्रीनगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर हजर झाल्या. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास श्रीनगर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अंमलदार यांनी अनिता यांना फोन केला. मात्र, अनिता यांच्याकडून फोनला काही उत्तर न मिळाल्याने महिला पोलीस अंमलदार यांनी प्रत्यक्ष महिला कक्षात जाऊन पहिले. तेव्हा त्यांना महिला पोलीस नाईक अनिता व्हावळ या पोलीस ठाण्यातील महिला कक्षाच्या फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या घेतलेल्या आढळून आल्या.

या प्रकरणी श्रीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपासला सुरुवात केली आहे. या महिला पोलीस नाईक अनिता यांनी कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात दिसून आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. महिला पोलीस नाईक अनिता व्हावळ यांनी ही आत्महत्या कौटुंबिक वादातून केली, की या आत्महत्येमागे आणखी काही कारण आहे हे मात्र पुढील पोलीस तपासात निष्पन्न होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *