ताज्याघडामोडी

राज्यसभेसाठी काँग्रेसने ‘मविआ’चा ‘हात’ सोडला; केवळ प्रतापगढींसाठीच लावली फिल्डिंग

राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

विजयासाठी दोन्ही बाजूला अगदी एक – एक मत महत्वाचं बनलं आहे. सोबत अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांच्या हातात विजयाची चावी आहे. अशातच आता काँग्रेसच्या दोन मतांचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसने त्यांचे उमेदवार इम्रान प्रतापगडी यांना कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये, यासाठी ४२ मतांच्या ऐवजी ४४ मतांचा सुरक्षित कोटा देण्याचे निश्चित केले आहे.

काँग्रेसचे पक्षप्रतोद सुरेश वरपुडकर यांनी तसा पक्षादेश (व्हिप) जारी केला आहे. कॉंग्रेसने लागू केलेला व्हीप सरकारनामाच्या हाती लागला आहे. त्यात केवळ कॉग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांनाच मतदान करण्याचा आदेश देण्यात आला आहे. मात्र यात दुसऱ्या क्रमांकाचे मत कुणाला द्यायचे याबाबत ही कोणताच आदेश नसल्याने आमदार संभ्रमात आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. कॉग्रेसचे आमदार पवई येथील west in hotel मध्ये आहेत, तिथेच या आमदारांच्या हातात पक्षादेश देण्यात आला आहे.

काँग्रेसकडे सध्या ४४ आमदार आहेत, तर विजयी होण्यासाठी ४१ मतांची गरज आहे. त्यामुळे सुरक्षित विजयी होण्यासाठी अतिरिक्त ३ मत जर इम्रान प्रतापगढी यांनाच दिली, तर शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना काँग्रेसच्या एकाही मताचा फायदा होणार नाही हे निश्चित आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकाची मते कोणाला द्यायची याबाबतही आदेश नसल्याने आता काँग्रेसचे आमदार दुसऱ्या क्रमांकाची मते कोणाला देतात याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान काँग्रेसच्या या व्हिपमागे काँग्रेसमध्ये असलेली नाराजी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण काँग्रेसचे ४४ आमदार असले तरी मंत्रिपद नाकारण्यात आल्याने अनेक आमदार नाराज आहेत. शिवाय महाविकास आघाडीत देखील सातत्याने काँग्रेसवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी काँग्रेसचे जेष्ठ नेते करत असतात. अशातच काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने इम्रान प्रतापगढी या बाहेरच्या उमेदवाराला लादल्याने पक्षात अस्वस्थता आहे आणि ती आशिष देशमुख यांच्यासारख्या पदाधिकाऱ्यांनी उघड बोलून देखील दाखवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *