ताज्याघडामोडी

लाल महालातील लावणीच्या व्हिडीओवरुन वाद; संभाजी ब्रिगेडचा तीव्र आक्षेप, जितेंद्र आव्हाडांचा ट्विट करत विरोध

पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या शायस्तेखानाची बोटं तोडली, त्याच लाल महालात लावणीची शुटिंग झाली, आणि बघता बघता याचा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला, यावर आता राजकीय, सामाजिक आणि सिनेसृष्टीतून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तर संभाजी ब्रिगेडने मात्र तीव्र आक्षेप नोंदवला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे, दरम्यान, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकाराचा विरोध केलाय. तर पुणे पोलिसांना आवाहन केले आहे.

सध्या सगळीकडे ट्रेडिंग असलेल्या चंद्रा गाण्यावर संबंधित तरुणी डान्स करताना दिसून येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा या गाण्यावर एक तरुणी पुण्यातील लाल महालातील मध्यवर्ती ठिकाणी थिरकताना दिसत आहे. संबंधित तरुणी लावणीवर बेभान होऊन अदाकारी करताना दिसत आहे. पुण्यातील ऐतिहासिक लाल महाल मध्ये लावणीचा व्हिडीओ शुट केल्यामुळे याचा विरोध म्हणून अनेक संघटना आता आक्रमक झाल्या आहेत.

दरम्यान, लाल महालात महापालिकेचे सुरक्षा रक्षकही तैनात असतात. मात्र तरीही संबंधित कलाकार आणि तरुणांनी सुरक्षारक्षकाला हाताशी धरुन लाल महालात लावणीचं शुटिंग केल्याचा आरोप केला जातोय. कुलदीप बापट यांनी या संबंधित गाण्याचं शूटिंग केलंय तर डान्सर वैष्णवी पाटील यांनी लावणी केल्याचं समोर आलंय. इंस्टाग्रामवर रिल्स शेअर करण्यासाठी चक्क लाल महालमध्ये ही लावणी करण्यात आली.

जितेंद्र आव्हाडांचा ट्विट, लाल महाल ही वास्तू नाच-गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे

या सर्व प्रकारावर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत याचा विरोध केला आहे. तसेच नागरिकांना आव्हानही केले आहे. ते म्हणाले, “पुण्यातला शिवाजी महाराजांचा लाल महाल ही वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे, यापुढे होता कामा नाही, कोणी केले असेल तर ते चित्रीकरण वापरू नका”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *