ताज्याघडामोडी

निवडणुका कधीही लागू दे, तुम्ही तयारीला लागा! शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हाप्रमुखांना आदेश

महाराष्ट्राच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. त्यासाठी जिह्याजिह्यांत जाऊन तेथील पायाभूत सुविधांचा आढावा घ्या, लोकांच्या समस्या जाणून घेऊन आपल्या सरकारच्या माध्यमातून कशा सोडवता येतील यासाठी पाठपुरावा करा, शिवसंपर्क अभियानातून आपली कामे जनतेपर्यंत पोहोचवा.

निवडणुका कधीही लागूद्यात, आतापासूनच तयारीला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीची माहिती शिवसेना सचिव-खासदार विनायक राऊत यांनी दिली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीपासून ते गावागावांतील विकासकामांसाठी आवश्यक मार्गदर्शन केले. राज्यात सर्वात मोठी कर्जमाफी आपल्या सरकारने केली आहे. शेतकऱयांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळाली असून त्यांचे सातबारा कोरे झाले आहेत.

त्याचप्रमाणे जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करतात त्यांनाही 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याची सरकारची योजना आहे. अशा ज्या शेतकऱयांना अनुदान मिळाले नसेल त्यांना ते मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करा, सरकारने जी विकासकामे केली आहेत ती कामे लोकांपर्यंत पोहोचवा, ज्या योजना हाती घेतल्या आहेत त्यांची माहिती लोकांना द्या. त्या योजनांचा लाभ या जनतेला करून देणे ही आपली जबाबदारी असल्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. या बैठकीला राज्याच्या सर्व जिह्यांचे जिल्हाप्रमुख, शिवसेना सचिव-खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

हाताला काम देणारे हिंदुत्व

महागाईचे चटके सर्वसामान्य जनतेला बसत आहेत. अशा परिस्थितीतही राज्यात उद्योग आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून आपण तरुणांना रोजगार मिळवून देत आहोत. हृदयात राम आणि हाताला काम देणारे हे आपले हिंदुत्व आहे. ही आपली हिंदुत्वाची व्याख्या जनतेपर्यंत पोहोचायलाच हवी. शिवसेना जे करेल ते आपल्या हिताचेच असेल हा विश्वास लोकांमध्ये निर्माण करा, असे मार्गदर्शन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *