गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

म्हातारपणाच्या आधारासाठी तीन लाखात बाळाची खरेदी; शिक्षिकेसह तीन जणांना अटक

नागपूर – म्हातारपणी आधार मिळावा या उद्देशाने एका शिक्षिकेने सुमारे तीन वर्षांपूर्वी एका मुलाला दलालांच्या मार्फत तीन लाख रुपयांमध्ये विकत घेतले होते. मात्र त्याच महिलेच्या मोठ्या मुलाने या प्रकरणाची गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केल्यामुळे मानव तस्करीची घटना उघडकीस आली आहे. तक्रात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तापसाअंती तीन महिलांसह एका दलालाला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात अटक झालेल्या दोन महिला एका रुग्णालयातील परिचारिका आहेत.

या प्रकरणात सहभागी असलेल्या शिक्षिका महिलेच्या घरी दोन मुलं आणि पती असे चार सदस्य होते. यापैकी मोठा मुलगा त्यांना चांगली वागणूक देत नाही. तर दुसऱ्या मुलाने काही वर्षांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे ती महिला एकटी पडली होती. दारुड्या मुलाकडे म्हातारपणी आपला निभाव लागणार नाही, या चिंतेत ती होती. त्यामुळे महिलेने एक मूल दत्तक घेण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यात यश न आल्याने त्यांनी (आयव्हीएफ) टेस्ट ट्यूब बेबीसाठी सुद्धा प्रयत्न केले. मात्र त्यातही यश मिळाले नाही.

त्यादरम्यान रुग्णालयातील दोन परिचारिका त्यांच्या संपर्कात आल्या. त्यांनी बाळ हवं असेल तर सलामुल्ला खान या एजंटसोबत संपर्क साधण्याचा सल्ला दिला. महिलेने एजंट सलामुल्ला खान सोबत संपर्क केला. त्यानुसार एजंटने तीन लाख रुपयांमध्ये बाळ उपलब्ध करून दिले. सुमारे तीन वर्षे ही बाब लपून राहिली. मात्र, ज्यावेळी त्या महिलेच्या मोठ्या मुलाला या प्रकरणाची कुणकुण लागली, तेव्हा पोलिसांनी गुप्त तपास सुरू केला. महिलेने बाळ तीन लाख रुपयांमध्ये विकत घेतल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी शिक्षिका महिलेसह दोन परिचारिका आणि सलामुल्ला खान याला अटक केली.

सलामुल्ला खानने महिलेला विक्री केलेले बाळ हे कुमारी मातेचे असावे असा संशय पोलिसांना आहे. त्याअनुषंगाने पोलिसांनी त्या बाळाच्या आईचा शोध सुरू केला आहे. मुख्य आरोपी सलामुल्ला खान याची नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथे बालगृह नावाची एक संस्था आहे. याशिवाय तो अत्याचार पीडित महिलांच्या उद्धारासाठी आश्रयगृह ही संस्था चालवतो. त्यातून संपर्कात आलेल्या महिलांचे बाळ तो विक्री करत असल्याचा संशय पोलिसांना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *