ताज्याघडामोडी

“चंद्रकांत पाटील आणि भाजपाने शरद पवारांची जाहीर माफी मागावी नाहीतर…”; राष्ट्रवादीचा इशारा

भाजपाच्या ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांविषयी एक आक्षेपार्ह ट्विट करण्यात आल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला कायदेशीर लढाईचा इशारा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी एक पत्रक जारी करत पवारांबद्दल करण्यात आलेल्या ट्विटवरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच भाजपाने पवारांची माफी मागणी असं म्हटलं आहे.

कीव येते…

भाजपाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ट्विट करत शरद पवार हिंदू धर्माचा द्वेष, अपमान करतात अशी मुक्ताफळे उधळलेली आहेत असं सांगत भाजपाच्या विपरीत बुद्धीची व जाती धर्मात तेढ निर्माण करण्याच्या वृत्तीची कीव येते असा टोला वरपे यांनी लगावलाय.

पवारांना हिंदू विरोधी ठरवून…

‘शरद पवार यांनी कधीही कोणत्याही जाती धर्माचा अपमान होईल, अशी कृती केलेली नाही. हिंदू देव देवतांचा अपमान केलेला नाही. उलट हिंदू धर्मातील देवदेवतांचा आदर करत आल आहेत. कित्येक हिंदू दवतांच्या मंदिरांचा पवार यांनी जीर्णोद्धार केलेला आहे, हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. पण महाराष्ट्रात काहीही करुन तेढ निर्माण करुन सत्तेसाठी हपापलेले भाजपाचे नेते पवारांना हिंदू विरोधी ठरवून खालच्या पातळीवरचे राजकारण करत आहेत,’ अशी टीका वरपे यांनी केलीय.

कवितेतील पाथरवट या शब्दाला अर्थ असा आहे, की…

“पवारांनी आपल्या भाषणात ज्या कवितेचा उल्लेख केला ती कवी जवहार राठोड यांच्या काव्यसंग्रहातील ‘डोंगराचे ढोल’ ही कविता होती. यात पाथरवट समाजाचे जीवन, वंचित, उपेक्षित समाजाची व्यथा मांडलेली आहे. समाजाचे दु:ख कविता, लेखांच्या माध्यमातून तोच समाज मांडत असेल, तर तो काय हिंदू धर्माचा किंवा देवदेवतांचा अपमान नसतो. त्या समाजाच्या न्याय हक्कासाठी शरद पवार गेली अनेक वर्ष लढत आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्र्ला माहीत आहे.

पवार यांनी कधीही हिंदू धर्माचा अपमान केलेला नाही. भाजपा नेते मात्र केवळ अर्धवट माहितीच्या आधारे आम्हीच फक्त हिंदूंचे कैवारी असा आव आणत आहेत. पवारांच्या भाषणातून एक छोटीशी क्लीप काढून हिंदू समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचे काम भाजपा करत आहे. कवी जवाहर राठोड यांच्या कवितेतील पाथरवट या शब्दाला अर्थ असा आहे, की दगडाला आकार देणारा समाज, मूर्ती घडवूनही या समाजाला देवळात जाण्याचा अधिकार नाही. या व्यथा या कवितेतून मांडल्या आहेत. याचाचा उल्लेख पवार यांनी आपल्या भाषणात केला. मात्र भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांना यातही जाती, धर्माचा तिरस्कार दिसला. यावरुन भाजपाच्या नेत्यांच्या बुद्धीची कीव येते,” असा टोला वरपे यांनी लागावला आहे.

भाजपावर कायदेशीर कारवाई

जाणीवपूर्वक हिंदू विरोधी प्रतिमा निर्माण करुन पवारांचा अपमान करणारे ट्विट भाजपाने केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय. हे ट्विट आक्षेपार्ह आहे. ते भाजपाने ट्विटर हॅण्डलवरुन काढून टाकावे आणि चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केलीय. चंद्रकांत पाटलांनी पवारांची माफी मागितली नाही तर त्यांच्यासोबतच भाजपावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि प्रवक्ते असमाऱ्या वरपे यांनी दिलाय.

“भाजपाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पवारांना जाणीवपूर्वक हिंदू धर्म विरोधी ठरविण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. पवारांविषयी आक्षेपार्ह मांडणी केलेले ट्विट काढून टाकून भाजपाने पवारांची माफी मागितली नाही, तर कायदेशी कारवाईला सामोरे जावे लागेल,” असा इशारा वरपे यांनी दिलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *