मीरा भाईंदर महानगरपालिकेची महासभा सुरु होती. यावेळी प्रेक्षक गॅलरीमध्ये पाणी व चहा न मिळाल्यामुळे थेट महासभा सुरू असताना सभागृहात प्रवेश करून प्रहार संघटनेच्या जिल्हाअध्यक्ष श्रीनिवास निकम यांनी गोंधळ घातला. महापौर व आयुक्तांच्या आदेशानुसार त्या जिल्हाअध्यक्षाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र जोपर्यंत संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल होत नाही, तो पर्यंत सभागृह सुरू होणार नाही, अशी माहिती महापौर जोत्सना हसनाळे यांनी दिली आहे.
मीरा भाईंदर महानगरपालिकेची सर्वसाधारण महासभा सोमवारी भरवण्यात भरवण्यात आली होती. सभागृहात महत्वाचे विषय सुरू असताना अचानक प्रेक्षक गॅलरीतून दुपारी तीनच्या सुमारास प्रहार संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास निकम यांनी सभागृहात प्रवेश केला. निकम सभागृहात घुसून थेट महापौर यांच्या जवळ जाऊन गोंधळ घातला. अचानक सभागृहात आल्याने सर्व सदस्य गोधळून गेले. परिस्थितीची गंभीर्यता पाहता निकम यांना सभागृहाबाहेर काढण्याकरिता उपस्थितीत नगरसेवक व शिपाई हे पुढे सरसावले. त्यानंतर निकम यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सभागृहाबाहेर काढले.
पालिका आयुक्तांनी या प्रकरणी शिपाई मधुकर पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. परिणामी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक बलाच्या कर्मचाऱ्यांची ही जबाबदारी असताना त्यांच्यावर तसेच संबंधित सभागृहात घुसलेल्या प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षवर कारवाई न करता पालिकेच्या शिपाई मधुकर पाटील यांना निलंबन हे चुकीचे असल्याचे उपमहापौर हसमुख गेहलोत यांनी म्हटले.