ताज्याघडामोडी

राज्यातील १५ जिल्ह्यांत नोव्हेंबरमध्ये एकही मृत्यू नाही

यंदाच्या वर्षांत कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात कमालीची घट झाल्याचे दिसून आले आहे. सकारात्मक बाब म्हणजे, राज्यातील १५ जिल्ह्यांत नोव्हेंबर महिन्यात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.कोरोनामुक्तीच्या दिशेने हे पाऊल असल्याची भावना वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

राज्यात अकोला, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, भंडारा, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या लाटेत डेल्टाचा प्रभाव सर्वाधिक होता, पण या जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद नाही. त्यानंतर चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांत अनुक्रमे दोन आणि एका मृत्यूची नोंद आहे. धुळे, नंदूरबार आणि जळगाव, हिंगोली आणि नांदेडमध्येही एकही मृत्यू झालेला नाही. कोकण विभागात पालघरमध्ये एकही मृत्यू झालेला नाही.

नोव्हेंबर महिन्यात राज्यात कोरोनामुळे ५९१ रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे. ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण १,०१३ होते. तर सप्टेंबरमध्ये ही संख्या १,६४५ इतकी होती. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यानंतर फेब्रुवारी महिन्यात १,४६३ वर असणारी मृत्यू संख्या मार्च महिन्यात ६,०७० वर पोहोचली. एप्रिल आणि मे महिन्यात अनुक्रमे २९,५५१ आणि २८,६६४ इतके मृत्यू झाले आहेत.

धुळे आणि भंडाऱ्यात एप्रिल आणि जून महिन्यापासून मृत्यूची नोंद झाली नाही. तर नंदुरबार आणि वाशिममध्येही लवकरच शून्य मृत्यूचे तीन महिने पूर्ण होणार आहेत. राज्यात या महिन्यात सर्वाधिक मृत्यू सहा जिल्ह्यात झाले आहेत, त्यात मुंबईत ४९, अहमदनगर ४६, सातारा २५, पुणे २३, रायगड १४, ठाणे १४ इ. मृत्यूची नोंद आहे. अन्य १४ जिल्ह्यात एक अंकी मृत्यू झाले आहेत.

राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले, कोरोनाचे मृत्यूही नियंत्रणात आहे, ही समाधानकारक बाब आहे. मात्र या स्थितीत बेसावध होऊन चालणार नाही, अधिक जबाबदारीने संसर्ग मुक्तीकडे वाटचाल करायला हवी. राज्यात दैनंदिन चाचण्या तीन लाख होत होत्या, आता हे प्रमाण एक लाखांवर आले आहे, हे चुकीचे असून दैनंदिन चाचण्यांवर लक्ष देणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *