ताज्याघडामोडी

एटीएम मधून पैसे काढताना शॉक लागल्याने तरुणाचा मृत्यू

पैसे काढण्यासाठी तुम्ही एटीएम मशीनचा वापर करत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये बुधवारी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एटीएम मशीनमधून पैसे काढत असताना विजेचा हाय व्होल्टेज धक्का लागून एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

तरुणाच्या मृत्यूमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, मृत्यूनंतर लोकांनी गोंधळ घातला आणि संताप व्यक्त केला.

ही घटना मेरठच्या लिसाडी गेट भागात घडली आहे. या परिसरात असणाऱ्या एका एटीएममधून 25 वर्षीय दानिश पैसे काढण्यासाठी आला होता. इंडिया वन एटीएम मशिनमधून पैसे काढत असताना त्याला अचानक हाय व्होल्टेज शॉक लागला, हा विजेचा धक्का इतका जबरदस्त होता कि यात दानिशचा जागीच मृत्यू झाला.

स्थानिक नागरिकांना एटीएम चेंबरमध्ये या तरुणाला वेदनेने ग्रासलेला पाहून धक्काच बसला. यावेळी नागरिकांनी त्याला कसेबसे एटीएम चेंबरमधून बाहेर काढले आणि नंतर रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

एटीएम मशिनमध्ये हाय व्होल्टेज करंट लागल्याच्या घटनेने परिसरातील नागरिकांनी एटीएम कंपनीवर संताप व्यक्त केला. लोकांनी याठिकाणी गोंधळ घातला आणि एटीएम कंपनीवर कारवाई करण्यात यावी आणि मृताच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली.

कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

दानिशचे कुटुंब अत्यंत गरीब असल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा यासाठी तो घरी शिवणकाम करायचा. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एटीएम कंपनीच्या निष्काळजीपणाबाबत आतापर्यंत पोलिसांमध्ये कोणीही तक्रार दिलेली नाही.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यास गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *