ताज्याघडामोडी

सोशल मिडियावरील मैत्री विवाहितेला महागात; धमकी देऊन केला अत्याचार

सोशल मिडियाचा वापर अतिशय सावधगिरीने करा, असे आवाहन केले जात असले तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी फार कमी वेळा केली जाते. सोशल मिडियाचा फायदा घेऊन अनेक जण गैरप्रकार करीत असतात.

असाच एक प्रकार आता समोर आला आहे. शेअर चॅट या सोशल मिडिया अॅपच्या माध्यमातून विवाहितेवर बलात्कार झाल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित महिला ही विवाहित आहे. गेल्या काही वर्षांपासून ती सोशल मिडियात सक्रीय आहे. या महिलेची शेअर चॅट या सोशल माध्यमाद्वारे एका तरुणासोबत मैत्री झाली. हा तरुण मुंबईचा आहे. मैत्री दिवसेंदिवस वाढत गेल्याने सहाजिकच एकमेकांना भेटण्याचे निश्चित झाले.

त्यासाठी शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जाण्याचे त्यांनी ठरविले. नियोजनानुसार दोघे जण तेथे भेटले. तेथे त्यांनी सेल्फीही काढले. मात्र, हे सेल्फी तुझ्या नवऱ्याला दाखवेल, अशी धमकी त्या तरुणाने विवाहितेला दिली. तसेच, तुझे लग्नही मोडू असे तो सांगत होता. त्यानंतर या तरुणाने महिलेला वणी आणि त्र्यंबकेश्वर येथे नेले. तेथे हॉटेलमध्ये या विवाहितेवर जबरदस्तीने बलात्कार केला.

हा सर्व प्रकार गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात घडल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनच्या सहायक निरीक्षक श्रीमती पी. डी. पवार तपास करीत आहेत. दरम्यान, सोशल मिडियाचा वापर अतिशय सावधगिरीने करावा, असे आवाहन पुन्हा एकदा पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *