ताज्याघडामोडी

उद्यापासून कामावर न येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर आम्ही कारवाई सुरू करू – अनिल परब

जी मुभा एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी दिली होती, ती आज ३१ मार्चपर्यंतची होती. ती मुदत आज संपत असून, आज दिवसाअखेर किती कर्मचारी कामावर हजर झाले, याची आकडेवारी माझ्याकडे येईल.

जे कर्मचारी हजर झाले त्यांच्यावर कारवाई होणार नाही. तसेच बडतर्फ आणि सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले असून उद्यापासून कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आम्ही कारवाई सुरू करू, असे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले आहेत.

मी आतापर्यंत सात वेळा कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आणि त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्याचे आवाहन केले. परंतु प्रशासन फक्त सांगते आणि करत काहीच नाही, असा एक समज झाल्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांना घेऊन एसटी सेवा सुरू करतो. याशिवाय आम्ही ११ हजार कंत्राटी चालक आणि वाहकांची नेमणूक करण्याचे आमचे टेंडर तयार आहे, त्यासंदर्भात आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊ, असे अनिल परब यांनी सांगितले.

तसेच उद्यापासून कामावर जे कर्मचारी येणार नाहीत, त्यांना नोकरीची गरज नाही, असे आम्ही समजू. वारंवार आवाहन करूनही ते कामावर हजर राहत नाहीत. न्यायालयाने त्यांच्यावर कारवाई न करण्याबद्दल कोणतेही आदेश दिलेले नाही. न्यायालयाने दिलेल्या निर्णयासंदर्भात आम्ही कॅबिनेटची मंजुरी घेतली आहे. ती मंजुरी घेतल्यानंतर आता आम्ही प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केल्याची माहिती त्यांनी दिली.

जी कारवाई नियमानुसार करायची, असेल ती कारवाई करू. मग ते निलंबन असो वा बडतर्फ करणे, असे अनिल परब म्हणाले. ११ हजार कंत्रांटी कर्मचारी आम्ही घेणार आहोत. या निकषात जे बसतील, त्यांना कामावर घेतले जाईल. सध्या ५ हजार बसेस सुरू झाल्या असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *