गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

चक्क पोलीस ठाण्यातच घेऊन गेले गावठी पिस्तूल

शेवगाव पोलीस ठाण्याच्या आवारात उभ्या केलेल्या चारचाकी वाहनातच एक गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

परमेश्वर बाबासाहेब पातकळ (वय 27, रा.चापडगाव, ता. शेवगाव) व सचिन विठ्ठल सोलाट (वय 23, रा. पिंपळवाडी, ता. पैठण, जि. संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पातकळ व सोलाट या दोघांविरुद्ध चंदाबाई कर्डिले यांनी फिर्याद दिली होती. त्यामुळे ते चारचाकी वाहनासह पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्याकडे आमच्याविरुद्ध गुन्हा दाखल का केला असा जाब विचारण्यासाठी आले होते.

यावेळी त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये एक गावठी कट्टा व चार जिवंत काडतुसे मिळून आली, तसेच नवनाथ इसारवाडे या नावाने ‘प्रेस’ असे इंग्रजीत लिहिलेले ओळखपत्रही सापडले.

पोलिसांनी 20 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, 400 रुपये किमतीची काडतुसे व चारचाकी वाहन असे 7 लाख 20 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल, ओळखपत्र जप्त केले आहे. आरोपीविरुद्ध आर्म्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक आशीष शेळके करीत आहेत.

चापडगाव 22 जानेवारी रोजी बसस्थानक चौकात दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी या गुह्यातील संशयित परमेश्वर पातकळ याच्यावर गावठी कट्टय़ाने गोळीबार केला होता. याबाबत त्याने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आज त्याच पातकळकडे गावठी कट्टा आढळून आल्याने तालुक्यात गावठी कट्टय़ांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *