आईला शिवी दिल्याच्या रागातून तरुणाने आपल्या शालेय मित्राची हत्या केली. मुंबईतील अंधेरी पूर्व भागात हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती आहे. खून प्रकरणी 22 वर्षीय तरुणाला रविवारी अटक करण्यात आली. रागाच्या भरात त्याने मित्राची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेत 21 वर्षीय तरुणाला प्राण गमवावे लागले.
महिन्याचा पगार झाल्यामुळे आरोपीने मित्राला पार्टीसाठी बोलावलं होतं. यावेळी दोघं जण मद्यपान करत होते. तेव्हा 21 वर्षीय तरुणाने आरोपीला त्याच्या आईवरुन शिवी घातली. याचा राग सहन न झाल्यामुळे आरोपीने मित्राची हत्या केल्याचा दावा केला जात आहे. दोघंही शालेय जीवनापासून मित्र असल्याची माहिती आहे.
काय आहे प्रकरण?
रागाच्या भरात मुंबईतील अंधेरी भागात 21 वर्षीय शाळकरी मित्राची हत्या केल्याच्या आरोपाखाली एका 22 वर्षीय तरुणाला रविवारी अटक करण्यात आली. दोघं मद्यधुंद अवस्थेत असताना मयत तरुणाने आरोपीच्या आईला शिवीगाळ केली होती. इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
मृत राहुल गायकवाड (21) आणि आरोपी सुशांत घोटकर (22) हे शाळेत असल्यापासून चांगले मित्र होते. राहुल बेरोजगार होता, तर आरोपी सुशांत हाऊसकीपिंगचे काम करत होता.
पगाराच्या पार्टीनंतर वाद
11 फेब्रुवारीला सुशांतला पगार मिळाल्याने दोघांनी पार्टी करण्याचा निर्णय घेतला. अंधेरी येथे तीन ठिकाणी त्यांनी मद्यपान केले. मद्यधुंद अवस्थेत मरोळ मरोशी रस्त्यावर फिरत असताना दोघांमध्ये वाद झाला. यावेळी राहुलने सुशांतच्या आईला शिवीगाळ केली. त्यामुळे चिडलेल्या सुशांतने संतापाच्या भरात राहुलला पेव्हर ब्लॉकने मारहाण केली. राहुलच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याचे पाहून सुशांत घाबरला आणि त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला.
उपचारांदरम्यान मृत्यू
एका पादचाऱ्याने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करुन सांगितले, की डोक्याला मार लागल्याने एक व्यक्ती रस्त्यात बेशुद्ध पडली आहे. त्यानंतर पोलिस व्हॅन घटनास्थळी पाठवण्यात आली आणि राहुल गायकवाड याला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला मार लागल्याने 12 फेब्रुवारी रोजी राहुलचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
राहुलच्या फोनच्या मदतीने पोलिसांनी तो मरोळ भागातील आदर्श नगर येथील रहिवासी असल्याची ओळख पटवली. त्याच्या भावाच्या तक्रारीवरून खुनाचा एफआयआर दाखल करण्यात आला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्हाला कळले की मयत तरुण आरोपीला शेवटचा भेटला होता. पुढील तपासानंतर आम्ही त्याला अटक केली, असे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी सांगितले.