गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मोक्कांतर्गत कारवाईची धमकी देत 10 लाखांची लाच घेतली, कोल्हापुरात दोन कॉन्स्टेबल गजाआड

तक्रारदाराच्या मुलाला दोन दिवस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत बसवून मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी देत 10 लाखांची लाच घेणाऱ्या दोन पोलीस कॉन्स्टेबलला जेरबंद करण्यात आले.

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयालगत या दोघांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

विजय केरबा कारंडे (वय 50, रा. उचगाव) आणि किरण धोंडीराम गावडे (वय 37, रा. केदारनगर मोरेवाडी, दोघे ता. करवीर) अशी अटक केलेल्या लाचखोर पोलिसांची नावे आहेत. दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.

तक्रारदाराचा मुलगा हा जुन्या स्पोर्ट्स बाईक विक्रीचा व्यवसाय करतो. मात्र, चोरीची बाईक आणून त्याची विक्री करतो. तसेच, बनावट स्मार्ट कार्ड बनवत असल्याचे कारण सांगून कारंडे आणि गावडे या कॉन्स्टेबलने 18 व 19 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत आणून त्याला दिवसभर बसवून ठेवले होते. तसेच, त्याच्यावर मोक्कांतर्गत गुन्हा दाखल करतो, असे धमकावून 25 लाखांच्या लाचेची मागणी केली.

यासंदर्भात संबंधित मुलाच्या वडिलांनी 20 जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या पडताळणीत दोन्ही कॉन्स्टेबलने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात दहा लाखांची लाच घेताना या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्यासह विकास माने, सुनील घोसाळकर, नवनाथ कदम, मयूर देसाई, रूपेश माने, सुधीर अपराध यांच्या पथकाने ही कारवाई केली.

महिन्यात तिसरी कारवाई

जानेवारी महिन्यातील पहिल्या आठवडय़ात राधानगरीचे प्रांताधिकारी आणि सरपंच लाच घेताना सापडले. दुसऱ्या आठवडय़ात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचा कॉन्स्टेबल लाच घेताना सापडला. तर आज तिसऱ्या आठवडय़ात आणखी दोन लाचखोर कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *