गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

प्रेमीयुगुलाने एकाच साडीने घेतला गळफास, महिला बचावली

बीड जिल्ह्यात प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्या दोघांनी एकाच साडीला गळफास घेतला होता. मात्र, महिलेच्या भागाकडील साडीची गाठ सुटल्याने ती यातून बचावली आहे.

मात्र, तरुणाचा मृत्यू झाला आहे. या युगुलाने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचा तपास पोलीस करत आहेत. महिलेने याबाबतची कोणतीही माहिती दिली नाही.

बीडमधील जयपाल व्हावल (24) आणि ठाण्यातील एका महिलेने रविवारी बीडमधील जयपालच्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. त्या दोघांनी ठरवून आत्महत्येचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी एकाच साडीच्या दोन टोकांनी गळफास घेतला. मात्र, महिलेच्या भागाकडील साडीची गाठ सुटल्याने ती बचावली आहे. तर जयपालचा मृत्यू झाला आहे.

हे दोघे फेसबुकद्वारे संपर्कात आले होते. त्यानंतर त्यांचे चॅटिंग सुरू झाले. एकमेकांची ओळख वाढल्यावर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, प्रत्यक्षात त्यांची ही पहिलीच भेट होती. या पहिल्याच भेटीत त्यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय का घेतला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

जयपाल व्हावल वडिलांसोबत बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये रेशन दुकान चालवत होता. दोन वर्षांपूर्वी त्याची ठाणे येथील महिलेशी फेसबुकवर ओळख झाली होती. महिला विवाहित असून तिला आठ वर्षांची मुलगी आहे. फेसबुकवर ओळख झाल्यावर ते दोघे नेहमी एकमेकांशी चॅटद्वारे संपर्कात होते. त्यानंतर त्यांच्यातील जवळीक वाढली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले, अशी माहिती बीड पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी विजेंद्र नाचण यांनी दिली.

ठाण्यातील ती महिला रविवारी बीडमध्ये जयपालला भेटण्यासाठी आली होती. जयपालने तिला आपल्या राहत्या घरी नेले आणि कुटुंबियांशी तिची ओळख करून दिली. जयपालने कुटुंबियांना सांगितले की, मी या महिलेशी लग्न करणार आहे. कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला संमती दर्शवली. मात्र, त्यांनी दोघांना कोर्ट मॅरेज करण्यास सांगितले.

ते दोघे रविवारी रात्री जयपालच्या खोलीत बराच वेळ बोलत होते. त्यावेळी जयपालने महिलेला सांगितले की, त्याला जगण्याची इच्छा नाही. आपण आपले जीवन संपवणार आहोत. मला तुला भेटण्याची इच्छा होती. मी तुझ्या भेटीची वाट बघत होतो. आता तुझी भेट झाल्यानंतर जीवन संपवण्याचा निर्णय मी घेतला आहे. महिलेने जयपालला सांगितले की, त्याने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असेल तर तीही त्याच्यासोबत आहे.

तुला जगायचे नसेल तर मलाही जगायचे नाही, असे महिलेने जयपालला सांगितले. त्यानंतर आम्ही दोघांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला, असे महिलने सांगितले. मात्र, त्याने आत्महत्येचा टोकाचा निर्णय का घेतला होता, याबाबत माहिती नसल्याचे महिलेने सांगितले.

आम्ही आत्महत्या करायचे ठरवून एक साडी घेत ती छताच्या अँगलला लटकवली. साडीच्या दोन्ही टोकांना गाठ मारली आणि आम्ही गळफास घेतला. मात्र, आपल्या बाजूकडील साडीच्या टोकाची गाठ सुटल्याने आपण खाली कोसळलो. त्यामुळे आपण आरडाओरडा करत जयपालच्या कुटुंबियांना बोलावले. त्यांनी जयपालच्या खोलीत धाव घेतली. घडलेली घटना लक्षात येताच त्यांनी तातडीने जयपालला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

याप्रकरणी बीड येथील स्थानिक तलवाडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून महिलेचा जबाब नोंदवला आहे. या प्रकरणात कोणताही गैरप्रकार किंवा फसवणूक झाल्याचे दिसत नाही. दोघांनी ठरवून आत्महत्या केली होती.

मात्र, त्यातून महिला बचावली असल्याचे तलवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रसाद नवघरे यांनी सांगितले. महिलेचा जबाब नोंदवून तिला नवऱ्याकडे ठाण्याला पाठवले. त्यानंतर महिलेची आई आणि बहिण तिला त्यांच्याकडे घेऊन गेल्या आहेत.

जयपालच्या कुटुंबियांनी मुलाच्या मृत्यूबाबत कोणाच्याही विरोधात तक्रार नसून कोणावरही संशय नसल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असली तरी त्या दोघांच्या आत्महत्येमागे नेमके काय कारण होते, याचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *