ताज्याघडामोडी

‘काका‘ खरंच बंड करणार ? परिचारक विरोधी आघाडीत सामील होणार ?

पंढरपूर नगर पालीकेच्या भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात सर्वाधिक काळ नगराध्यक्षपद भुषविलेल्या नगराध्यक्षा म्हणून ज्यांची नगर पालीकेच्या राजकीय इतिहासात नोंद झाली आहे व भविष्यात इतक्या दिर्घकाळ नगराध्यक्ष पद कुणाला भुषविण्यास मिळेल अशी शक्यता नसल्याने 29 डिसेंबर रोजी साडेसात वर्षे व 15 दिवसांचा कार्यकाळ पुर्ण करुन माजी नगराध्यक्षा साधना भोसले या कार्यकाळ संपुष्टात आल्याने पदावरुन बाजुला झाल्या आहेत.

15 डिसेंबर 2021 रोजी नागेश भोसले यांच्या संकल्पनेतून पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी मा.आ.प्रशांत पारिचारक यांची निवड झाल्याबद्दल सत्कार सोहळाही आयोजीत करण्यात आला होता व या सोहळ्यात बोलताना माजी नगराध्यक्षा साधना भोसले यांनी यापुढेही आपण राजकारात सक्रिय राहणार असल्याचे संकेत दिले होते व स्व.मा.आ.सुधाकरपंत परिचारक यांच्या आठवणींना उजाळा देताना त्या काहीशा भावुकही झाल्या होत्या.या कार्यक्रमास परिचारक गटाचे सर्व नगरसेवक व प्रमुख कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते व कार्यक्रमानंतर सामिष भोजनाचा आस्वाद घेत भोजन बनविण्याचा ‘ठेका‘ घेतलेल्या आचार्‍यांचेही कौतुक करत बाहेर पडले होते.तर मागील बर्‍याच महिन्यापासून ‘काका‘बंड करणार या चर्चेने निर्माण झालेले संशयाचे मळभही हटले होते.

मात्र ‘काका‘ 30 डिसेंबर नंतर नक्कीच आपली भुमिका जाहीर करणार आहेत अशी चर्चाही सुरु झाली आणि पुन्हा परिचारक समर्थकात अस्वस्थता तर काही कट्टर भालके समर्थकात बैचैनी निर्माण झाली.अशातच एका पक्षाच्या राज्याच्या नेत्याने आपण आगामी निवडणुकीत नगर पालीकेत सत्तांतर घडवून आणत स्व.आ.भारतनानांचे स्वप्न पुर्ण करणार असल्याचे सांगत नव्या आघाडीच्या संकल्पनेचे संकेत देण्यास सुरवात केली.अशातच असे संकेत देणार्‍या नेत्याच्या सोबतीला ‘काका‘ आहेत अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आणि सोशल मिडियावर समर्थकांच्या पोस्टने यावर शिक्कामोर्तबही होऊ लागले.

गत पंधरवढ्यात पंढरी वार्ताने या बाबत ‘काकांशी‘ संवाद साधत कानोसा घेतला असता परिचारक यांनी माझ्यावर पुर्ण विश्वास ठेवत साडेसात वर्षे नगराध्यक्ष पदाची संधी माझ्या घरात दिली.साडेसात वर्षाच्या काळात स्व.मा.आ.सुधाकरपंत परिचारक आणि मा.आ.प्रशांत परिचाारक यांच्या पाठबळामुळेच नगर पालीकेच्या माध्यमातून शहरात कोट्यावधींची विकास कामे झाली.असे असताना आम्ही नाराज असण्याचे कारण काय ? असाच प्रतिप्रश्न केला होता.

नोव्हेंबर 2011 मध्ये पंढरपूर नगर पालीकेतील परिचारक गटाची 18 वर्षाची सत्ता उलथवून टाकत स्व.आ.भारत भालके,भीमा परिवाराचे नेते धनंजय महाडिक व कल्याणराव काळे यांनी एकत्र येत तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून नगर पालीकेत सत्तांतर घडविले होते.मात्र या आघडीच्या ानगरसेवकातील अर्तंगत हेवेदावे.नगरसेवकातील हमरीतुमरीचे प्रसंग,विविध टेंडरवरुन होणारी वादावादी यामुळे या आघाडीचे तीनही नेते वैतागून गेले होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे 18 नगरसेवक होते तर परिचारक समर्थक आघाडीचे 15 नगरसेवक .तिर्थक्षेत्र विकास आघाडीतील नगरसेवकांध्ये सुरु असलेल्या अर्तंगत कलहाचा आस्वाद नगर पालीकेच्या विविध सर्वसाधारण सभेत परिचारक समर्थक नगरसेवक मजेने घेत होते.मात्र याच वेळी ‘काकांनी‘ ‘नियोजन‘ केले,गटाच्या नेत्याची संमती मिळवीली आणि नगर पालीकेत 25 वर्षानंतर बंड झाले.15 जुन 2013 मध्ये नगराध्यक्षपदी साधना भोसले या आरुढ झाल्या.तिर्थक्षेत्र विकास आघाडीत झालेल्या नगरसेवकांच्या बंडामुळे स्व.आ.भारत भालके हे संतापले होते.मात्र संख्याबळासमोर त्यांचाही नाईलाज झाला होता.

यानंतर 2016 मध्ये झालेल्या जनतेतुन झालेल्या नगराध्यक्षपदाच्या व नगरसेवकांच्या निवडणुकीत तिर्थ क्षेत्र विकास आघाडीने संतोष नेहतराव यांना उमेदवारी दिली खरी पण या आघाडीतीलच काही नेत्यांनी नेहतराव यांच्या पेक्षा ‘काकांच्या‘ शब्दाला मान दिल्याचीही जोरदार चर्चा झाली.तर शिवाजी कोळी आणि युवराज पाटील यांची उमेदवारी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष नेहतराव यांच्यासाठी अडचणीची ठरली.

2016 च्या नगर पालीका निवडणूकीनंतर नगर पालीकेत आणि पंढरपूरच्या राजकिय व सामाजिक वर्तुळात कांकांचे वजन भलतेच वाढले.अशातच या काळात राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार सत्तेत असल्याने मा.आ.प्रशांत पारिचारक यांनी पंढरपूर शहर व तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वपुर्ण असलेल्या शेकडो कोटींच्या कामांना राज्य व केंद्र शासनाकडून मंजुरी मिळवत या परिसराचा कायापालट करण्यात महत्वाची भुमिका बजावण्यास कसर ठेवली नाही.याच कालवधीत पंढरपूर नगर पालीकेच्या माध्यमातून व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून पंढरपूर शहरात कोट्यावधी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली व प्रत्यक्षात अनेक कामांना निधीही मिळाला व सुरवातही झाली.त्यामुळे नगर पालीकेच्या वर्तुळातही परिचारक समर्थक नगरसेवक मोठ्या आत्मविश्वासाने वावरत असल्याचे दिसून आले.तर विरोधी तिर्थक्षेत्र आघाडी फारशी प्रभावी भुमिका पार पाडत नाही अशी चर्चाही होऊ लागली.

मात्र याच वेळी सत्ताधारी परिचारक समर्थक आघाडीतील काही जेष्ठ नगरसेवक हे पार्टीमिटींग मध्ये उघडपणे नाराजी व्यक्त करत अनेक टेंडर व निकृष्ट कामे यामुळे सामान्य जनतेला आम्हाला तोंड द्यावे लागते.आम्ही 2014,2019 व 2021 च्या विधानसभा निवडणुकीत आमच्या नेत्याच्या आदेशाबर हुकुम आमच्या प्रभागातून मोठे लीड दिले आहे.तरीही नगर पालीकेत आम्हाला विचारात घेतले जात नाही असा आरोप हे नगर सेवक पार्टी मिटींग मध्ये करतात याची उघड चर्चा शहरात होताना दिसून आली.

पण या सार्‍या गोष्टींकडे कानाडोळा करत पंढरपूर विकास आघाडीचे मार्गदर्शक मा.आ.प्रशांत परिचारक व अध्यक्ष उमेश परिचारक हे दुर्लक्ष करीत आले व विकास कामे हाच मुख्य अजेंडा घेवून येणार्‍या नगर पालीका निवडणुकीत जनतेसमोर जायचे आहे हे ओळखून आपल्या गटाच्या काही जेष्ठ नगरसेवकांना शांत करत राहीले अशीही चर्चा होताना दिसून आली.

या सार्‍या घडामोडीमुळे ‘काका‘ नाराज आहेत आगामी नगर पालीका निवडणूकीत ते वेगळी भुमिका घेणार अशी चर्चाही सुरु झाली.अशातच कांकाशी घनिष्ट मैत्री असलेल्या एका पक्षाच्या राज्याच्या नेत्याने आगामी नगर पालीका निवडणुकीत नगर पालीकेतील परिचारकांची सत्ता उलथवून लावायचा विडा उचलत तिर्थक्षे विकास आघाडी व राष्ट्रवादीतील एका गटाशी संधान बांधत प्रयत्न सुरु केल्याने या नेत्यासोबत ‘काकांची‘ वर्षानुवर्षाची दोस्ती आता राजकीय आघाडीत परावर्तीत होणार असल्याच्या चर्चेने पंढरपूरात जोर धरला आहे.

मात्र याच वेळी नगर पालीका निवडणुकीत भालके गटास सहकार्य करीत आलेले काही कट्टर परिचारक विरोधक व 2013 च्या तिर्थक्षेत्र विकास आघाडीतील बंडाची तर 2016 च्या नगर पालीका निवडणुकीतील पराभवाची सल असलेले अनेकजण वेगळी भुमिका खाजगीत मांडत असून गेल्या 5 वर्षात नगर पालीकेत ज्यांना विरोध केला,विविध टेंडर आणि कामे या बाबत संताप व्यक्त केला त्यांच्या समवेतच जर आघाडी करुन आगामी नगर पालीका निवडणूक लढवायची असेल तर टिका कुणावर आणि कशी करायची असाही सवाल उपस्थित करत आहेत.

तर ‘काका‘ आगामी नगर पालीका निवडणुकीत परिचारक यांची साथ सोडणे कदापिही शक्य नाही,गेल्या साडेसात वर्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत नगर पालीकेच्या कारभारात ‘काकांचा शब्द‘ कधीही मोडला गेला नाही असा विश्वास अनेक परिचारक समर्थक व्यक्त करताना दिसून येत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *