ताज्याघडामोडी

संजय राऊत यांच्या परिवाराला करोनाची लागण; आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीही करोनाबाधित

राज्यातल्या करोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वेगाने वाढत आहे. राज्यातल्या नेत्यांना आणि मंत्र्यांनाही करोनाची लागण झाली आहे. ठाकरे सरकारमधले १२ मंत्री आणि वेगवेगळ्या पक्षातले जवळपास ७० आमदार सध्या करोनाबाधित आहे. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या परिवारातल्या चार सदस्यांना करोना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.

संजय राऊत यांच्या आई, पत्नी, मुलगी आणि पुतणीला करोना संसर्ग झाला आहे. घरातील सदस्यांना सर्दी, ताप आणि खोकल्याची लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे या सर्वांची चाचणी करण्यात आली. त्यानंतर चार जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले. या सर्वांना सौम्य लक्षणे असल्यामुळे सध्या तरी त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.

करोनाचा संसर्ग झालेल्या मंत्र्यांमध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, के. सी. पाडवी आणि प्राजक्त तनपुरे यांच्यासह इतर सहा मंत्र्यांचा समावेश आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनाही करोना संसर्ग झाला आहे. 

आमदार रोहित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह 61 आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबरोबरच  राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजपा नेत्या पंकजा मुंडे, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील-ठाकरे (हर्षवर्धन पाटील यांची मुलगी) या नेत्यांनाही करोना संसर्ग झाला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *