ताज्याघडामोडी

बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर नेमकं कसं कोसळलं?; अखेर सत्य आलं समोर!

देशाचे पहिले संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर नेमके कसे कोसळले, याबाबत अनेक तर्क लावले जात असतानाच या दुर्घटनेची चौकशी पूर्ण झाली असून त्यात दुर्घटनेमागे खराब हवामान हे प्रमुख कारण असल्याचा निष्कर्ष काढला गेल्याचे सांगण्यात येत आहे. एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीने आपला अहवाल कायदा विभागाकडे पाठवला असून येत्या आठवड्यात हा अहवाल हवाईदल प्रमुखांकडे सोपवला जाणार आहे.

तामिळनाडूतील कुन्नूर येथे ८ डिसेंबर रोजी भारतीय हवाईदलाचे एमआय- १७ व्ही ५ हे हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्व १४ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेने अवघा देश हादरला होता. याप्रकरणी तातडीने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले होते.

चौकशीची धुरा एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्याकडे देण्यात आली होती. मानवेंद्र यांच्या टीमने घटनास्थळी जाऊन अनेक अंगानी दुर्घटनेची चौकशी केली असून त्याचा अहवालही तयार करण्यात आला आहे. त्याबाबत अधिकृत माहिती हवाईदलाकडून देण्यात आली नसली तरी दुर्घटनेमागे खराब हवामान हेच प्रमुख कारण होते, असा समितीचा निष्कर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे.

‘दुर्घटना घडली त्यादिवशी कुन्नूर भागात दाट धुके होते. परिणामी दृष्यमानता कमी होती. त्यातून हेलिकॉप्टर भरकटल्याने ही दुर्घटना घडली असावी’, असा निष्कर्ष या समितीने काढल्याचे सांगण्यात येत आहे. समितीचा अहवाल सध्या कायदेशीर सल्ला घेण्यासाठी कायदे विभागाकडे पाठवण्यात आला असून येत्या आठवड्यात हा अहवाल हवाईदल प्रमुखांकडे सोपवण्यात येणार आहे. चौकशी समितीने दुर्घटनेच्या अनुषंगाने संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत.

उटीजवळच्या जंगलात ही दुर्घटना घडली. तेथील प्रत्यक्षदर्शींकडूनही माहिती घेण्यात आली आहे. दुर्घटनेच्या काही वेळ आधीचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्या व्यक्तीशी संपर्क साधून मोबाइलचीही पडताळणी करण्यात आली आहे. घटनास्थळावरून ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला होता. त्यातील डेटाही अहवालात अंतर्भूत करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *