ताज्याघडामोडी

नवीन वर्षापासून ATM मधून पैसे काढणे महागणार, पाहा काय आहेत नियम…

ग्राहकांना आता एटीएमधून विनाशुल्क पैसे काढण्यावर मर्याद आल्या आहेत. ग्राहकांनी जर आता ATM व्यवहार मर्यादा ओलांडली तर त्यांना 1 जानेवारी 2022 पासून अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत.

कारण भारतीय रिझर्व्ह बँक ने प्रत्येक सार्वजनिक आणि खासगी बँकेसाठी पैसे काढण्यावर शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जून 2021 च्या आदेशाप्रमाणे, 1 जानेवारी 2022 पासून लोकांनी विनामूल्य व्यवहाराची मर्यादा ओलांडल्यानंतर बँकांना एटीएम व्यवहारांवर प्रति व्यवहार 21 रुपये आकारण्याची परवानगी दिली आहे. याशिवाय ग्राहकांना त्यावर जीएसटीही भरावा लागणार आहे. या नव्या नियमांमुळे एटीएममधून पैसे काढणं किंवा इतर कोणतेही व्यवहार करणं तुम्हाला महागात पडणार आहे

दरम्यान, ग्राहकांना त्यांच्या स्वतःच्या बँकेच्या एटीएममधून महिन्यातून पाच वेळा विनामूल्य पैसे काढता येणार आहेत. पाचपेक्षा जास्त वेळा पैसे काढले तर ग्राहकांना अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत. तर इतर बँकांच्या एटीएममधून तीन वेळा विनामूल्य व्यवहार करू शकता. इतर एटीएमधून तीनपेक्षा जास्त वेळ पैसे काढले तर त्यांनी अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत.

रिझर्व्ह बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘बँकांना उच्च विनिमय शुल्काची भरपाई करण्यासाठी आणि खर्चात सामान्य वाढ लक्षात घेता, त्यांना ग्राहक शुल्क प्रति व्यवहार 21 रुपये करण्याची परवानगी आहे. एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँकेने आधीच ग्राहकांना विकासाबद्दल माहिती देण्यास सुरुवात केली आहे.

आरबीआयच्या मंजुरीनंतर खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना माहिती देण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भातील माहिती ग्राहकांना एसएमएसद्वारे पाठवली जात आहे.

एसएमएसमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक किंवा इतर बँकेच्या एटीएममधून मोफत मर्यादेनंतर केलेल्या व्यवहारावर 21 रुपये शुल्क आणि जीएसटी भरावा लागणार आहे. यासाठी आधी 20 रुपये आकारले जात होते. परंतु, आता या रकमेत वाढ करण्यात आली असून आता 21 रुपये आकरण्यात येणार आहेत.

मेट्रो शहरात राहणाऱ्या ग्राहकांसाठीच्या नियमातही बदल करण्यात आले आहेत. बंगळुरू, मुंबई, चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि हैद्राबाद शहरातील एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या ग्राहकांना एटीएममधून तीन वेळा निशुल्क पैसे काढता येणार आहेत.

आणखी एक बदल आहे, ज्याबद्दल तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. बँकांना प्रत्येक व्यवहारासाठी इंटरचेंज शुल्क वाढवण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. आर्थिक व्यवहारांसाठी हे शुल्क 15 रुपयांवरून 17 रुपये करण्यात आले आहे. गैर-आर्थिक व्यवहारांसाठी इंटरचेंज फी 5 रुपयांवरून 6 रुपये करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *