मुंबईतल्या दहीसर भागात असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेत बुधवारी संध्याकाळी चारच्या सुमारास चोरट्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तसेच बँकेच्या शाखेचा सुरक्षा रक्षक जखमी झाला.
या घटनेत मास्क घातलेले दोनजण बँकेत आले. त्यांनी बँकेत असलेले कर्मचारी संदेश गोमरे यांच्याकडून रोख रक्कम असलेली बॅग हिसकाण्यास सुरूवात केली. मात्र संदेश गोमरे यांनी चोरट्यांना प्रतीकार केला. यादरम्यान या चोरटयांनी संदेश गोमरे यांच्यावर गोळीबार केला आणि त्या ठिकाणाहून फरार झाले.
पैशांची बॅग लुटण्याआधी संदेश गोमरेवर चोरटयांनी गोळीबार केला होता. संदेश यांच्या छातीत गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. हे दोघे चोरटे पायी आले होते. हे चोरटे संदेशकडे असलेली अडीच लाखांची रक्कम घेऊन पसार झाले. या झटापटीत संदेश यांचा मृत्यू झाला आहे तर एक सुरक्षा रक्षक जखमी झाला आहे.
या चोरट्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी आठ पथके तयार केली आहेत. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने चोरटयांनी हा गोळीबार केला. या घटनेची माहिती मिळताच एमएचबी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे. हि घटना दुपारी 4 च्या सुमारास घडली.